Donald Trump On Iran: अमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त हल्ल्यामुळे इराण हादरलं आहे. इराणची राजधानी तेहरानवर अनेक भीषण हल्ले करण्यात आले आहेत. इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणनेही प्रतिहल्ले केले असून युद्धाचा भडका उडाला आहे. तर अमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे. खामेनी यांच्या मृत्यूमुळे इराणने संतप्त होत अमेरिका आणि इस्त्रायलवर खूप मोठा हल्ला करण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, इराणच्या या इशाऱ्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देत पुन्हा अतिशय शक्तिशाली हल्ला करण्याची धमकी इराणला दिली आहे. त्यामुळे आता हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच ट्रुथ सोशलवर एक पोस्ट केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, “इराणने नुकतंच म्हटलं की ते आज खूप मोठा हल्ला करणार आहेत. जो त्यांनी (इस्रायल-अमेरिकेने) यापूर्वी कधीही पाहिला नसेल. मात्र, त्यांनी (इराणने) असं करून नये. कारण जर इराणने असं केलं तर आपण त्यांच्यावर अतिशय शक्तिशाली हल्ला करू, ज्याची पूर्वी इराणने कधीही कल्पना केली नसेल”, असा मोठा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एका पोस्टमध्ये काय म्हटलं?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या एका पोस्टमध्ये म्हटलं की, “अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे राबवलेल्या मोहिमेत इराणचे सर्वोच्च नेते खामेनी ठार आहेत. इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्तीला आम्ही ठार केलं आहे. आता इराणच्या जनतेने रस्त्यावर उतरावं आणि आपला देश ताब्यात घ्यावा. आम्ही जी कृती केली ती इराणच्या दृष्टीने योग्य आहे. खामेनी इराणच्या लोकांवर अन्याय करत होते”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

कोण होते अयातुल्ला खामेनी?

अयातुल्ला खामेनी यांनी जवळपास तीन दशकांपासून इराणवर एकहाती वर्चस्व गाजवलं. खामेनी हे इराणचे प्रमुख होते, पण त्याचबरोबर ते इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड कोअरचे (आयआरजीसी) कमांडर-इन-चीफही होते, या सर्व अधिकारांमुळे खामेनी हे इराणचे सर्वात शक्तिशाली नेते होते. मात्र, आता अमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.