Donald Trump Benjamin Netanyahu tense conversation: पश्चिम आशियातील इराण संघर्षातून अद्याप तोडगा निघालेला नसताना इस्रायलने लेबनॉनमधील हेजबोला गटाविरोधात सशस्त्र कारवाई करण्याची तयारी केली होती. इस्रायलच्या या कृतीवर इराणने तीव्र आक्षेप घेतल्यानंतर अमेरिका-इराणमधील शस्त्रसंधी धोक्यात आली. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्याशी फोनवरून संवाद साधत असताना तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचीही माहिती समोर येत आहे.
इस्रायलने आपल्या सैन्याला लेबनॉनमध्ये शिरण्याचे आदेश दिल्यानंतर सोमवारी इराण आणि अमेरिकेदरम्यानचा शस्त्रसंधीचा करार धोक्यात आला होता. इस्रायलने दिवसभरात दक्षिण बेरुतवर हल्ले वाढवण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर इस्रायलने लेबनॉनवरील हे हल्ले थांबवले नाहीत, तर इराण आणि अमेरिकेदरम्यानचा शस्त्रसंधी करार लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता आहे, असे वृत्त इराणच्या सरकारी वाहिनीने दिले. ज्यामुळे पुन्हा एकदा पश्चिम आशिया प्रदेशात युद्धाची भीती निर्माण झाली होती.
अमेरिकेबरोबरच्या कोणत्याही करारासाठी लेबनॉनमधील इस्रायलचे हल्ले थांबवणे ही एक या कराराची प्रमुख अट असेल, असे इराणने यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे. इस्रायलने लेबनॉनवर बॉम्बहल्ला केल्यानंतर इराणने अमेरिकेबरोबरची चर्चा स्थगित करण्याचा इशारा दिला होता.
डोनाल्ड ट्रम्प-नेतान्याहू यांच्यात खडाजंगी
लेबनॉनवरील हल्ले थांबविण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी ते वेडेपणा करत आहेत, असे ट्रम्प म्हणाले. या दोन्ही नेत्यांच्या संभाषणातील सारांश एका अमेरिकी अधिकाऱ्याने ॲक्सिओस या वृत्तसंस्थेला सांगितला.
“तू पूर्णपणे वेडा आहेस. जर मी नसतो तर तू तुरुंगात असतास. मी तुला वाचवत आलो आहे. प्रत्येकजण तुझा तिरस्कार करतो. तुझ्या कृतीमुळे प्रत्येकजण आता प्रत्येकजण इस्रायलचा द्वेष करु लागला आहे”, अशा शब्दांत ट्रम्प यांनी नेत्यानाहू यांना सुनावल्याचे वृत्त ॲक्सिओसने दिले आहे.
याच वृत्तात आणखी एका सूत्राने दिलेल्या महितीनुसार, ‘तुम्ही हे काय करत आहात?’, असा प्रश्न विचारत ट्रम्प नेतान्याहू यांच्यावर खेकसले. तसेच इस्रायलमधील भ्रष्टाचार प्रकरणात आपण पाठिंबा दिल्यामुळेच तुम्ही तुरुंगात जाण्यापासून वाचलात, अशी आठवणही ट्रम्प यांनी यावेळी करून दिली.
एका अमेरिकी अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, इस्रायलने लेबनॉनची राजधानी बैरूतवर हल्ला करण्याची धमकी दिल्यामुळे इस्रायल जागतिक स्तरावर एकाकी पडण्याचा धोका अधिकच वाढेल, अशा इशारा ट्रम्प यांनी दिला. तसेच आणखी एका अधिकाऱ्याने म्हटल्यानुसार, इस्रायलच्या हल्ल्यात लेबनॉनमधील मृतांची संख्या वाढली असून हेजबोलाच्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी इस्रायलकडून इमारतींना लक्ष्य केले जात आहे. या कृतीमुळे ट्रम्प संतप्त झाले आहेत.
नेतान्याहू यांनी कसा प्रतिसाद दिला?
दरम्यान दोन्ही नेत्यांच्या फोनवरील संभाषणानंतर बिन्यामिन नेतान्याहू यांनी निवेदन जाहीर करत आपली भूमिका मांडली. हेजबोलाने इस्रायलवर हल्ले करणे थांबवले नाही, तर इस्रायलही बैरूतवरील लक्ष्यांवर हल्ला करेल. आमची भूमिका कायम आहे, असे नेतान्याहू यांनी स्पष्ट केले.
