Donald Trump blockades Strait of Hormuz: इराणबरोबर पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चर्चेतून कोणताही ठोस पर्याय समोर आला नाही. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी या चर्चेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते. वाटाघाटी अपयशी ठरल्यानंतर आता पुढील निर्णयांची जबाबदारी डोनाल्ड यांनी स्वत:कडे घेतली आहे. ट्रम्प यांनी इराणची कोंडी करण्यासाठी पावले उचण्यास सुरुवात केली असून, होर्मुझ सामुद्रधुनीत नाकेबंदीला सुरुवात केली आहे. होर्मुझमधून बाहेर पडणाऱ्या आणि आत प्रवेश करणाऱ्या जहाजांना रोखण्याचा इशारा अमेरिकेने दिला आहे.

होर्मुझमध्ये नाकेबंदीला सुरुवात

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रात्री साडे सात वाजेपर्यंतची मुदत दिली होती. मुदत संमाप्त होताच आता अमेरिकेच्या लष्कराने होर्मुझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदी सुरु केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: याबाबत ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करुन माहिती दिली आहे. इराणचे नौदल पूर्णपणे नष्ट झाल्याचे सांगताना त्यांच्याकडे आता केवळ कमी धोक्याचे जहाजं शिल्लक आहेत. पण, उरलेल्या या जहाजांनी नाकेबंदीच्या जवळ येण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर जबरदस्त हल्ला केला जाईल, असा धमकी वजा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

ट्रम्प यांची धमकी

‘ट्रुथ सोशल’वर डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्टकरुन इराणला इशारा दिला आहे. “इराणची नौसेना समुद्राच्या तळाशी आहे, त्यांची १५८ जहाजे पूर्णपणे नष्ट केली आहेत. आम्ही त्यांच्या ‘फास्ट अटॅक शिप्स’ म्हणवणाऱ्या कमी संख्येच्या जहाजांना लक्ष्य केलेले नाही, कारण आम्ही त्यांना फार धोकादायक मानत नाही. पण, यापैकी कोणतेही जहाज आमच्या नाकाबंदीच्या जवळ आले, तर समुद्रातील बोटींवरील ड्रग डीलर्सविरुद्ध आम्ही ज्या पद्धतीने कारवाई करतो, त्याच पद्धतीचा वापर करून त्यांना नष्ट केले जाईल. ही पद्धत जलद आणि क्रूर असेल”, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.

मुदत संपताच नाकेबंदीला सुरुवात

“समुद्रमार्गे अमेरिकेत येणारी ९८.२ टक्के ड्रग्सची तस्करी थांबली आहे”, असाही दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी ट्रुथ सोशल’वर नाकेबंदीबाबात पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये सोमवारी रात्री साडे सात (भारतीय वेळेनुसार) मुदत देण्यात आली होती. ही मुदत आज समाप्त होत असल्याने ट्रम्प यांनी नाकेबंदी सुरु केल्याचे स्पष्ट केले आहे. होर्मुझमधील माईन्स हटवण्याचे काम अमेरिकेच्या लष्कराने हाती घेतल्याचेही त्यांनी सांगितले. अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीत नाकेबंदी सुरु केल्याने आता हे युद्ध अधिक भीषण वळण घेण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

युद्ध अधिक तीव्र होण्याची भीती

पाकिस्तानमध्ये अमिरेका आणि इराण यांच्यात झालेली चर्चा निष्फळ ठरली होती. इराण कधीच अण्वस्त्र निर्मिती करणार नाही, या अमेरिकेच्या भूमिकेला मान्य करण्यास नकार दिल्याने दोन्ही देशातील चर्चा फिस्कटली. दरम्यान, यानंतर आता अमेरिकेने आक्रमक पवित्रा घेतला असून, युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.