अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कोणत्या न कोणत्या कारणांनी कायम चर्चेत असतात. ते कधी पत्रकार परिषदेत बोलताना वादग्रस्त टिप्पणी करतात, तर कधी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ सोशलवर पोस्ट करत सर्वांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. कधी-कधी तर पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प यांना राग अनावर झाल्याचंही अनेकदा समोर आलेलं आहे. आता देखील असाच प्रकार पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे.

प्रश्न विचारणाऱ्या एका पत्रकारावर डोनाल्ड ट्रम्प हे चांगलेच भडकले आहेत. तसेच प्रश्न विचारणाऱ्या एका पत्रकाराच्या शारीरिक व्यंगावर ट्रम्प यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. ‘तुमची अवस्था खूपच वाईट दिसतेय, आधी स्वतःला शेपमध्ये आणा, स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्या’, अशा प्रकारचं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

नेमकं काय घडलं?

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोग्याविषयी आणि रॅली रद्द करण्याबाबत एका पत्रकाराने डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न विचारला. मात्र, हा प्रश्न ऐकल्यानंतर ट्रम्प पत्रकारावर चांगलेच भडकले. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, “असा प्रश्न विचारणं म्हणजे तुमची विकृत मानसिकता आहे. तुम्ही मानसिकदृष्ट्या आजारी आहात. तुमची संस्थाही फारच वाईट आहे.” असं म्हणत ट्रम्प यांनी संबंधित पत्रकाराला स्वतःला सुदृढ ठेवण्याचा सल्ला दिला.

तसेच यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी काही क्षणांसाठी त्या पत्रकाराची नक्कलही केली. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “या माणसाकडे बघा. याची प्रकृती अजिबात ठीक नाहीये. तसेच मी तर स्वतःवर लक्ष ठेवतो. स्वतःची काळजी घेतो. त्यामुळे मला अगदी उत्तम वाटत आहे”, असं म्हणत ट्रम्प यांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावर संताप व्यक्त केला.

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून ट्रम्प यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. अनेकांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे.