PM Modi Trump Call regarding Iran conflict escalation and global energy security : पश्चिम आशियामधील युद्ध संपवण्यासाठी पाकिस्तानमध्ये झालेल्या वाटाघाटी अपयशी ठरल्यानंतर इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून जवळपास ४० मिनिटे चर्चा केली.

इस्लामाबादमध्ये रविवारी (११ एप्रिल) अमेरिका आणि इराण यांच्यात जवळपास २१ तास वाटाघाटी झाल्या, मात्र दोन्ही देशांमध्ये कोणत्याही करारावर एकमत होऊ शकले नाही. यामुळे त्यांच्यातील दोन आठवड्यांसाठीच्या युद्धविरामाबाबत पुन्हा एकदा अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.

अमेरिका आणि इराणमधील युद्धविरामानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सुमारे ४० मिनिटे फोनवर चर्चा झाली. पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ट्रम्प यांच्याशी काय चर्चा झाली याबद्दल माहिती दिली आहे.

पंतप्रधान मोदी एक्सवर केलेल्या आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, “माझे मित्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मला फोन आला. आम्ही विविध क्षेत्रांमधील आमच्या द्विपक्षीय सहकार्यामध्ये केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. आम्ही सर्व क्षेत्रांमधील आपली सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी अजून मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहोत. याबरोबरच आम्ही पश्चिम आशियामधील स्थितीवरही चर्चा केली आणि होर्मुझची सामुद्रधुनी खुली आणि सुरक्षित ठेवण्याच्या महत्त्वावर भर दिला.”

या चर्चेच्या पार्श्वभूमीवर, भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी सांगितले की, भारत आणि अमेरिकेचे संबंध अतिशय मजबूत स्थितीत आहेत. मोदी आणि ट्रम्प यांच्यात झालेल्या चर्चेबद्दल माहिती देताना गोर म्हणाले की, ट्रम्प हे पंतप्रधान मोदींना म्हणाले की, “मला फक्त तुम्हाला हे सांगायचे आहे की, आम्हा सर्वांचे तुमच्यावर प्रेम आहे,” असे वृत्त पीटीआयने दिले आहे.

दरम्यान अमेरिका आणि इराण यांच्यात मॅरेथॉन चर्चेनंतरही कोणताही तोडगा निघू शकलेला नाही, यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की, इराणने आपल्या अण्वस्त्र कार्यक्रम सोडून देण्यास नकार दिल्याने वाटाघाटी फिस्कटल्या. तर दुसरीकडे, इराणने नेमके मुद्दे स्पष्ट न करता अमेरिका चर्चा भरकटवल्याचा आरोप केला. इतकेच नाही तर वाटाघाटी फिस्कटल्यानंतर ट्रम्प यांनी इराणची होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी तेल निर्यात रोखण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर एक पोस्ट शेअर करत, “अमेरिकेचे नौदल होर्मुझ सामुद्रधुनीकडे जाणाऱ्या किंवा तिथून येणाऱ्या प्रत्येक जहाजाला रोखणार आहे”, अशी घोषणा केली होती.

अमेरिका-इराण यांच्यात पुन्हा चर्चा

इस्लामाबाद येथे ११ एप्रिल रोजी झालेल्या चर्चेतून ठोस तोडगा न निघाल्याने अमेरिकेने आता होर्मुझ सामुद्रधुनीत नाकेबंदी केली आहे. यानंतर, आता उभय देशांतील चर्चेच्या दुसऱ्या फेरीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, अमेरिका आणि इराणमध्ये शांतता चर्चेची दुसरी फेरी याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांचे शिष्टमंडळ चर्चेसाठी पुन्हा इस्लामाबादमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या अखेरीस उभय देशांत दुसऱ्यांदा चर्चा पार पडेल, असे रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे. या चर्चेची नेमकी तारीख अद्याप समोर आलेली नाही पण, आठवड्याच्या शेवटी चर्चा होण्याची संकेत वृत्तातून देण्यात आलेत.