Donald Trump on Shree Thanedar : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी भारतीय वंशाचे डेमोक्रॅट श्री ठाणेदार यांच्यावर टीका केली. श्री ठाणेदार यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात पुन्हा एकदा महाभियोगाचा खटला दाखल केला आहे. त्यामुळे मिशिगनमधील सार्वजनिक कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प यांनी श्री ठाणेदार यांना वेडा म्हटलंय. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

सेल्फ्रिजच्या भेटीदरम्यान आणि नंतर मॅकॉम्ब काउंटी कम्युनिटी कॉलेजमधील एका रॅलीत बोलताना ट्रम्प यांनी ठाणेदार यांची खिल्ली उडवली. ते म्हणाले, “श्री ठाणेदार यांनी पुन्हा तेच केले. ज्या माणसाबद्दल मी कधीही ऐकले नाही, तो काँग्रेसमन आहे का?”, असे म्हणत त्यांनी मिशिगनचे रिपब्लिकन रिपब्लिकन जॉन जेम्स यांच्याकडे पाहिले. “हा माणूस म्हणाला की डोनाड्र ट्रम्पवर महाभियोग सुरू करणार. पण मी काय केलंय?”

ठाणेदार यांनी सोमवारी बेकायदेशीर हद्दपारी, न्यायालयाचे आदेश न मानणे आणि हानिकारक कर यासारख्या मुद्द्यांचा उल्लेख करून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोगाचे सात खटले दाखल केले होते. “आपण पुन्हा एकदा हे बघूया. ते माझ्यावर महाभियोग चालवू इच्छितात, हा वेडा उठला आहे. मला आत्ताच कळले की माझ्यावर पुन्हा महाभियोग चालवला जात आहे” ट्रम्प म्हणाले.