Donald Trump returns to White House : एकीकडे इराणविरोधातील युद्ध थांबावे याकरता वाटाघाटी सुरू असतानाच या राजनैतिक प्रयत्नांना यश मिळाले नाही तर इराणवर पुन्हा एकदा हल्ले करण्याकरता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गंभीर विचार करत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शासकीय कामाचे कारण देत आपले न्यू जर्सीतील वीकेंडचे बेत रद्द केले असून ते वॉशिंग्टनला परतले आहेत. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “शासनाशी संबंधित परिस्थितीमुळे” ते त्यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहू शकणार नाहीत. यापूर्वी त्यांनी हा ‘मेमोरियल डे’ वीकेंड त्यांच्या गोल्फ प्रॉपर्टीवर घालवण्याचे नियोजन केले होते. परंतु, ते इराणविरोधातील हल्ल्यांच्या तयारीत असल्याचं म्हटलं जातंय.
अमेरिका संभाव्य हल्ल्यांच्या तयारीत
‘सीबीएस न्यूज’ (CBS News) नुसार, ट्रम्प प्रशासन इराणविरुद्ध लष्करी हल्ल्यांच्या नवीन फेरीची तयारी करत होते, परंतु शुक्रवारपर्यंत याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आला नव्हता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमेरिकन सैन्य आणि गुप्तचर विभागाच्या काही भागांनी आपल्या सुट्ट्यांचे बेत रद्द केले असून त्यांना ‘स्टँडबाय’वर ठेवण्यात आले आहे. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी सांगितलं, “राष्ट्राध्यक्षांनी आपल्या मर्यादा (रेडलाईन्स) अत्यंत स्पष्ट केल्या आहेत, इराणकडे कधीही अणुअस्त्र असू शकत नाही आणि ते त्यांचे समृद्ध युरेनियम स्वतःकडे ठेवू शकत नाहीत. राष्ट्राध्यक्ष नेहमी सर्व पर्याय खुले ठेवतात. जर इराण करार करण्यात अपयशी ठरला, तर त्याचे काय परिणाम होतील याबाबत राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
“एप्रिलच्या सुरुवातीला तात्पुरती युद्धबंदी सुरू झाल्यापासून अमेरिका आणि इराणने एकमेकांवर थेट हल्ले करणे बहुतांश वेळा टाळले आहे. दीर्घकालीन करारावर पोहोचण्यासाठी दोन्ही देशांमध्ये अप्रत्यक्ष चर्चा सुरू आहे. ट्रम्प म्हणाले, “इराण करार करण्यासाठी उत्सुक आहे. पाहूया काय होते ते.” ते आधी असेही म्हणाले होते की, अमेरिकेच्या ताज्या प्रस्तावावर उत्तर देण्यासाठी तेहरानकडे (इराणकडे) काही दिवसांचा वेळ असेल.
इराणवर हल्ले करण्याकरता ट्रम्प गंभीर विचार करत आहेत
तर, अॅक्सिऑसच्या एका अहवालानुसार, अमेरिकी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर शेवटच्या क्षणी केलेल्या राजनैतिक प्रयत्नांतून यश आले नाही, तर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इराणवर नव्याने लष्करी हल्ले करण्याचा ‘गंभीरपणे विचार करत आहेत’. इराण संघर्ष आणि संभाव्य पुढील पावलांचा आढावा घेण्यासाठी ट्रम्प यांनी शुक्रवारी सकाळी त्यांच्या वरिष्ठ राष्ट्रीय सुरक्षा पथकासोबत एक उच्चस्तरीय बैठक बोलावल्यानंतर हे मूल्यांकन समोर आले.
राजकीय वाटाघाटींचे मार्ग अजूनही सक्रिय असले तरी नाजूक आहेत. वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यातील मतभेद कमी करण्यासाठीचा अखेरचा मध्यस्थीचा प्रयत्न म्हणून पाकिस्तानचे लष्करप्रमुख, फील्ड मार्शल आसिम मुनीर, सध्या तेहरानमध्ये आहेत. सुरू असलेल्या वाटाघाटींना पाठिंबा देण्यासाठी कतारचे एक शिष्टमंडळही इराणच्या राजधानीत दाखल झाले आहे.
इराणचे प्रत्युत्तर आणि इशारे
इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने (IRGC) इशारा दिला आहे की, अमेरिका किंवा इस्रायलने केलेल्या कोणत्याही नवीन हल्ल्यांमुळे हा संघर्ष अधिक वाढू शकतो. सरकारी माध्यमांनी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, इराणचे सशस्त्र दल कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहे. इराणकडून लवकरच उत्तर मिळणे अपेक्षित असून, हे उत्तर मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या पाकिस्तानमार्फत पोहोचवले जाऊ शकते.
अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी सांगितलं की, वॉशिंग्टन उत्तराची प्रतीक्षा करत आहे आणि लष्करी पर्याय तयार ठेवत असतानाच ट्रम्प हे राजनैतिक तोडग्याला प्राधान्य देत आहेत. त्यांनी आवश्यकतेनुसार ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ पुन्हा खुली करण्याबाबत नाटो (NATO) मित्रदेशांसोबत झालेल्या चर्चेचाही उल्लेख केला. दरम्यान वॉशिंग्टनमध्ये, हाऊस रिपब्लिकनने पुरेसा पाठिंबा नसल्याचा निष्कर्ष काढल्यानंतर, इराणविरुद्ध लष्करी कारवाई करण्याच्या ट्रम्प यांच्या अधिकारांवर मर्यादा आणण्याचे आपले प्रयत्न सोडून दिले आहेत.
