Donald Trump China Visit : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन दौऱ्याची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. ट्रम्प हे दोन दिवस चीनच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात महत्वाच्या विषयांवर चर्चा पार पडल्या आहेत. या बरोबरच अमेरिका-इराण युद्ध, होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासह आणखी काही जागतिक मुद्यांवर चर्चा झाल्याचं सांगितलं जातं.

या बरोबरच या दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यातील द्विपक्षीय बैठकीत दोन्ही देशांच्या मैत्री आणि सहकार्यावर भर देण्यात आला. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांचं कौतुक करत ते महान नेते असल्याचा उल्लेखही केला. दरम्यान, ट्रम्प यांचा चीन दौरा आटोपल्यानंतर ते पुन्हा अमेरिकेला रवाना झाले. मात्र, यावेळी चीनमधून अमेरिकेला रवाना होत असताना डोनाल्ड ट्रम्प यांना चीनकडून मिळालेल्या सर्व भेटवस्तू ट्रम्प यांच्या शिष्टमंडळाने कचऱ्याच्या डब्यात फेकून दिल्याचा दावा केला जात आहे.

याबाबत सोशल मीडियावर अनेक पोस्ट, फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. चीनकडून मिळालेल्या भेटवस्तू ट्रम्प यांच्या शिष्टमंडळाने खरंच कचऱ्यात फेकल्या का? अमेरिकी अधिकाऱ्यांनी असं का केलं? यामागचं कारण काय? याबाबत अमेरिकी अधिकाऱ्यांनी काय स्पष्टीकरण दिलं? याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नेमकं काय घडलं?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा चीन दौरा आटोपल्यानंतर ते बीजिंगहून अमेरिकेला रवाना झाले. मात्र, यावेळी ट्रम्प यांच्या टीमने त्यांच्या ‘एअर फोर्स वन’ विमानात कोणतीही चिनी वस्तू घेण्यास नकार दिला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या चीन दौऱ्यात त्यांच्यासह त्यांच्याबरोबर असलेल्या शिष्टमंडळाला अनेक भेटवस्तू मिळाल्या होत्या. मात्र, या चिनी भेटवस्तू व्हाईट हाऊसचे कर्मचारी आणि अमेरिकन पत्रकारांचा समावेश असलेल्या अमेरिकी शिष्टमंडळाने विमान तळावरील कचऱ्याच्या डब्यात फेकल्याचा दावा करण्यात आला आहे.

समोर आलेल्या वृत्तानुसार, अमेरिकी शिष्टमंडळाने केलेलं हे कृत्य काही नवीन नाही. कारण अमेरिका अनेकदा राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेच्या कारणास्तव ही पद्धत अवलंबत आल्याचं सांगितलं जातं. फरक फक्त एवढाच की यावेळी या भेटवस्तू कचऱ्याच्या डब्यात सर्वांसमक्ष फेकून देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये बर्नर फोन, लॅपेल बॅजेस, पत्रकार परिषदेची आमंत्रणं आणि स्मृतिचिन्ह यासह आदी वस्तूंचा समावेश होता असं सांगितलं जात आहे. मात्र, असं करण्यामागचा हेतू हा चिनी हेरगिरीची कोणतीही शक्यता टाळणं हा असल्याचं बोललं जात आहे.

चिनी भेटवस्तू कचऱ्यात का फेकल्या?

अमेरिकेच्या शिष्टमंडळासाठी हा आदेश आधीच देण्यात आलेला होता. कारण विमानात चिनी बनावटीची कोणतीही वस्तू आणण्यास परवानगी नव्हती. याबाबत व्हाईट हाऊस सुरक्षा आणि सिक्रेट सर्व्हिसने याची अंमलबजावणी केली. मात्र, ही माहिती प्रसिद्ध अमेरिकन पत्रकार एमिली गुडिन यांनी उघड केली. त्यांनी याबाबत एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर करत म्हटलं की, “आम्ही एअर फोर्स वनमध्ये चढण्यापूर्वी चिनी अधिकाऱ्यांनी दिलेल्या सर्व चिनी भेटवस्तू, ओळखपत्र, व्हाईट हाऊस कर्मचाऱ्यांचे बर्नर फोन हे अमेरिकी कर्मचाऱ्यांनी गोळा केल्या आणि एका कचऱ्याच्या डब्ब्यात फेकून दिल्या. कारण विमानात चीनमधून कोणतीही वस्तू आणण्यास परवानगी नव्हती.”

दरम्यान, यामागचं कारण हे हेरगिरी आणि सायबर सुरक्षा हे सांगितलं जातं. तसेच अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षा प्रोटोकॉलचा भाग म्हणून चीनकडून मिळालेल्या भेटवस्तू कचऱ्याच्या डब्यात फेकल्या असल्या तरी यावरून सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आल्याचं दिसून येत आहे.

ट्रम्प यांच्या चीन दौऱ्यात काय काळजी घेण्यात आली?

एअर फोर्स वन विमानात मोबाईल फोन फॅरेडे बॅग (Faraday Bag) मध्ये ठेवण्यात आले होते. असं केल्याने डेटा हॅक होण्यापासून संरक्षण करता येतं. या बॅग केवळ वायरलेस सिग्नल रोखत नाहीत, तर जीपीएस, वाय-फाय, ब्लूटूथ आणि आरएफआयडी सिग्नललही रोखून धरतात. ट्रम्प आणि त्यांच्या टीमने संपूर्ण प्रवासात फक्त बर्नर फोन आणि बर्नर ईमेल ॲड्रेस वापरले आहेत. दरम्यान, ट्रम्प यांच्या या दोन दिवसीय चीन दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यात मैत्रीपूर्ण वातावरण असल्याचं दिसून आलं असलं तरी पडद्यामागे, सुरक्षा नियमावलीवरून चिनी अधिकारी, अमेरिकन सिक्रेट सर्व्हिस आणि अमेरिकन पत्रकार यांच्यात तणाव स्पष्टपणे दिसून येत होता असं इंडिया टुडेने एका वृत्तात म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट चर्चेत; कोणाला धरलं जबाबदार?

डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर एक पोस्ट शेअर केली. त्यांच्या या पोस्टची मोठी चर्चा रंगली. शी जिनपिंग यांनी अमेरिकेबाबत केलेल्या एका वक्तव्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी आता स्पष्टीकरण दिलं. शी जिनपिंग यांनी अमेरिकेचा अधोगतीला लागलेला किंवा ऱ्हास होणारा देश असा उल्लेख केला होता. त्याबाबत आता डोनाल्ड ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांचं ते वक्तव्य १०० टक्के खरं असल्याचं म्हटलं. मात्र, तो काळ जो बायडेन यांच्या सत्ताकाळातील होता, असं ट्रम्प यांनी म्हटलं.

ट्रम्प यांनी म्हटलं की, “जेव्हा शी जिनपिंग यांनी अमेरिकेचं अधोगतीला लागलेला देश असं वर्णन केलं, तेव्हा त्यांचा रोख हा ‘स्लीपी जो बायडेन’ आणि त्यांच्या प्रशासनाने चार वर्षांच्या काळात केलेल्या प्रचंड नुकसानीच्या अनुषंगाने होतं आणि ते १०० टक्के बरोबर होतं. कारण देशाच्या खुल्या सीमा, उच्च कर आकारणी, ट्रान्सजेंडर व्यक्तींना मिळणारी संधी, विविधता आणि समावेशकता धोरणं, वाईट व्यापारी करार, वाढता गुन्हेगारीचा दर आणि अशा अनेक गोष्टींमुळे आपल्या देशाला तेव्हा प्रचंड नुकसान सहन करावं लागलं आहे.”

Donald Trump China Visit Gifts In Trash

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये १६ महिन्यांत अमेरिकेने जगाला दाखवलेल्या ‘अविश्वसनीय प्रगती’चा उल्लेख करत केला. त्यांनी शेअर बाजार आणि ४०१ के (निवृत्ती योजना) मधील सर्वकालीन उच्चांक, व्हेनेझुएलामधील लष्करी विजय आणि चांगेल संबंध, तसेच इराणचा लष्करी पराभव (क्रमशः) अशा मुद्यांचा ट्रम्प यांनी उल्लेख केला.