Donald Trump China Visit : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर आहेत. या दोऱ्यात डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्या आहेत. शी जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचं चीनमध्ये जंगी स्वागत केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी शी जिनपिंग आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात इराण युद्ध, होर्मुझ सामुद्रधुनी अडथळ्याशिवाय खुली करण्यासह आदी मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
या दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यातील द्विपक्षीय बैठकीत दोन्ही नेत्यांनी मैत्री आणि सहकार्यावर भर दिला. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांचं कौतुक करत ते महान नेते असल्याचंही म्हटलं आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी आता ‘ट्रुथ सोशल’वर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टची मोठी चर्चा रंगली आहे.
शी जिनपिंग यांनी अमेरिकेबाबत केलेल्या एका वक्तव्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे. शी जिनपिंग यांनी अमेरिकेचा अधोगतीला लागलेला किंवा ऱ्हास होणारा देश असा उल्लेख केला होता. त्याबाबत आता डोनाल्ड ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांचं ते वक्तव्य १०० टक्के खरं असल्याचं म्हटलं. मात्र, तो काळ जो बायडेन यांच्या सत्ताकाळातील होता, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट शेअर करत दावा केला की आता त्यांच्या (ट्रम्प यांच्या) अध्यक्षतेखाली अमेरिका जगातील एक प्रमुख आर्थिक आणि लष्करी शक्ती म्हणून पुन्हा उदयास आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्या त्या वक्तव्याला जो बायडेन यांच्या प्रशासनावरील टिप्पणी होती असं सांगत आता अमेरिका पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि चांगल्या स्थितीत असल्याचं सांगण्याचा प्रयत्न ‘ट्रुथ सोशल’वरील पोस्टमधून केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं?
ट्रम्प यांनी म्हटलं की शी जिनपिंग यांनी अमेरिकेबाबत केलेलं ते वक्तव्य १०० टक्के अचूक होतं. या वक्तव्याचं स्पष्टीकरण देताना ट्रम्प यांनी जो बायडेन यांच्या प्रशासनाच्या प्रभावाचा हवाला देत तेव्हा कमकुवत सीमा सुरक्षा, जास्त कर, सामाजिक मुद्द्यांवरील धोरणात्मक बदल आणि व्यापक आर्थिक गैरव्यवस्थापन या गोष्टींना दोष दिला.
याबाबत ट्रम्प यांनी म्हटलं की, “जेव्हा शी जिनपिंग यांनी अमेरिकेचं अधोगतीला लागलेला देश असं वर्णन केलं, तेव्हा त्यांचा रोख हा ‘स्लीपी जो बायडेन’ आणि त्यांच्या प्रशासनाने चार वर्षांच्या काळात केलेल्या प्रचंड नुकसानीच्या अनुषंगाने होतं आणि ते १०० टक्के बरोबर होतं. कारण देशाच्या खुल्या सीमा, उच्च कर आकारणी, ट्रान्सजेंडर व्यक्तींना मिळणारी संधी, विविधता आणि समावेशकता धोरणं, वाईट व्यापारी करार, वाढता गुन्हेगारीचा दर आणि अशा अनेक गोष्टींमुळे आपल्या देशाला तेव्हा प्रचंड नुकसान सहन करावं लागलं आहे.”
ट्रम्प यांनी स्वत:च्या कार्यकाळातील कामगिरीची वाचली यादी
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये १६ महिन्यांत अमेरिकेने जगाला दाखवलेल्या ‘अविश्वसनीय प्रगती’चा उल्लेख करत केला. त्यांनी शेअर बाजार आणि ४०१ के (निवृत्ती योजना) मधील सर्वकालीन उच्चांक, व्हेनेझुएलामधील लष्करी विजय आणि चांगेल संबंध, तसेच इराणचा लष्करी पराभव (क्रमशः) अशा मुद्यांचा ट्रम्प यांनी उल्लेख केला.
“तसेच जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य, पुन्हा एकदा आर्थिक महासत्ता, जिथे इतर देश अमेरिकेत विक्रमी १८ ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक करत आहेत, इतिहासातील सर्वोत्तम अमेरिकन बाजारपेठ, जिथे पूर्वीपेक्षा जास्त लोक काम करत आहेत, देशाला उद्ध्वस्त करणाऱ्या विविधता आणि समावेश (DEI) प्रणालीचा अंत, आणि अशा अनेक गोष्टी ज्यांची केवळ यादी करणं अशक्य आहे”, असं सांगत ट्रम्प यांनी स्वत:च्या कार्यकाळातील कामगिरीची यादीच सांगितली.

ट्रम्प यांनी अमेरिकेला सर्वात शक्तिशाली राष्ट्र संबोधलं
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये शी जिनपिंग यांनी अल्पावधीत मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आणि म्हणाले की, “अधोगतीला लागलेला देश या स्थितीतून बाहेर पडून अमेरिकेने आपलं जागतिक महत्त्व पुन्हा प्राप्त केलं आहे आणि ते चीनबरोबर अधिक मजबूत व उत्तम संबंधांची अपेक्षा करत आहे. दोन वर्षांपूर्वी आपण खरोखरंच एक अधोगतीला लागलेला देश होतो, यावर मी शी जिनपिंग यांच्या वक्तव्याशी पूर्णपणे सहमत आहे. मात्र, आता, अमेरिका जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्र आहे आणि आशा आहे की चीनबरोबरचे आपले संबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि चांगले होतील”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
इराणच्या अण्वस्त्रांना चीनचाही विरोध, ‘होर्मुझ’ खुली ठेवण्यावर दोन्ही महासत्तांचे एकमत
डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर आहेत. ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात इराण युद्ध आणि होर्मुझ सामुद्रधुनीबाबत महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत होर्मुझ सामुद्रधुनी कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्णपणे खुली करण्यात यावी या मुद्यावर दोन्ही देशांनी भर दिला. तसेच, इराणकडे कधीही अण्वस्त्रं असू नयेत, याला चीनने देखील समर्थन दिले.

होर्मुझ खुली करण्याबाबत एकमत
व्हाईट हाऊसच्या प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार, होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याबाबत चर्चा झाली. ऊर्जा वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ही सामुद्रधुनी खुली राहणे आवश्यक आहे, यावर दोन्ही देशांचे एकमत झाले. तसेच, होर्मुझमध्ये लष्करी बळाचा वापर करणे आणि तिथं कोणत्याही प्रकारचे शुल्क आकरणी करणे चुकीचे असल्याचे मत जिनपिंग यांनी व्यक्त केले.
अमेरिकी व्यवसायांना चिनी बाजारपेठेत संधी द्या : ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यात झालेल्या चर्चेची माहिती व्हाईट हाऊसकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. ट्रम्प आणि जिनपिंग यांच्यात अत्यंत सकारात्मक बैठक पार पडली. यावेळी दोघांमध्ये दोन्ही देशांतील आर्थिक सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या विविध मार्गांवर चर्चा केली. अमेरिकी व्यवसायांना चिनी बाजारपेठेत अधिक संधी उपलब्ध करून देणे, अमेरिकेतील उद्योगांमध्ये चिनी गुंतवणूक वाढवणे याबाबत देखील सविस्तर चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली. बैठकीच्या एका सत्रात अमेरिकेतील अनेक बड्या कंपन्यांचे प्रमुख देखील सहभागी झाले होते.
