Donald Trump on Iran War and Crude Oil Price Drop: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधातील युद्ध लवकरच संपुष्टात येणार असल्याची घोषणा केली आहे. भारतात १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेनिमित्त रशिया, चीन, इराणचे राष्ट्रप्रमुख भारतात आलेले असताना ट्रम्प यांनी ही घोषणा केल्यामुळे त्याचे महत्त्व वाढले आहे. पश्चिम आशियातील संघर्षाचा फटका संपूर्ण जगाला बसत असल्याचा मुद्दा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज मांडला होता. ब्रिक्स परिषदेत याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती.
ट्रम्प यांची युद्धबंदीची भाषा निवडणुकीसाठी
नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत मध्यावधी निवडणुका होत आहेत. इराण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे इतर क्षेत्रांनाही त्याचा फटका बसत आहे. डोनाल्ड ट्रम्प हे आयर्लंडच्या दौऱ्यावर आहेत डब्लीन येथील पत्रकार परिषदेत त्यांना इराण युद्ध कधी संपुष्टात येणार? असा प्रश्न विचारला गेला. त्यावर ते म्हणाले, “मला वाटते लवकरच युद्धाची समाप्ती होईल. मध्यावधी निवडणुकीनंतर लगेचच युद्ध संपू शकते.”
तेलाच्या किमती कमी होणार
“मध्यावधी निवडणुकीत गुंतागुंत निर्माण करण्यासाठी त्यांच्याकडून शक्य तितका वेळ काढण्याचा प्रयत्न होत आहे. पण मला वाटते लोकांनाही याची जाणीव झाली आहे. जेव्हा केव्हा युद्ध संपेल तेव्हा कच्च्या तेलाच्या किमती खाली येतील”, असेही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
Reporter:
— Global Brief (@globalbrief_now) September 12, 2026
“When will the war in Iran end?”
President Donald Trump:
“I think very soon, probably right after midterms. They are trying to hold out as long as they can to complicate the election.” pic.twitter.com/AS2Dlikqp0
इराणने काय म्हटले?
इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान हे ब्रिक्स परिषदेनिमित्त भारतात आलेले आहेत. त्यांनी शनिवारी मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्याबरोबर झालेल्या बैठकीदरम्यान म्हटले की, अमेरिकेने पश्चिम आशियामध्ये प्रादेशिक पोलीस असल्याची भूमिका बजावू नये. या प्रदेशाची प्रादेशिक अखंडता आणि सुरक्षा केवळ त्यातील घटक, तेथील देशांद्वारेच सुनिश्चित केली जाऊ शकते.
“इराणला युद्ध आणि सततचा संघर्ष नको आहे”, असे सांगून पेझेश्कियान यांनी शांततेचे आवाहन केले. आमच्या लोकांवर झालेल्या सर्व अन्यायानंतरही आम्हाला युद्ध नको आहे आणि ते पुढे चालू राहावे असेही आम्हाला वाटत नाही. शांततेला आमचे प्राधान्य आहे, असेही ते म्हणाले.
