US Plan fo Venezuela: दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशांनुसार व्हेनेझुएलावर अमरिकेने हवाई हल्ला चढवला. या हल्ल्यात व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमरिकेने कैद केलं आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून या हल्ल्याचं जोरकसपणे समर्थन केलं जात असताना खुद्द अमेरिकेतच विरोधी पक्षांनी ट्रम्प यांना या हल्ल्यावरून लक्ष्य केलं आहे. त्याचवेळी जगभरातील अनेक देशांनी अमेरिकेच्या या आक्रमक भूमिकेवर टीका केली आहे. या सर्व घडामोडींदरम्यान व्हेनेझुएलामध्ये आता नेमकं काय घडणार आहे? याविषयी वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. खुद्द अमेरिकेनेही आपल्या भूमिकेपासून २४ तासांत घुमजाव केलं आहे!
काय म्हणाले होते डोनाल्ड ट्रम्प?
व्हेनेझुएलावर हल्ला केल्यानंतर निकोलस मादुरो यांना अटक केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. त्यावर संशय व्यक्त करण्यात येत असतानाच अमेरिकेकडून मादुरो यांची अटकेनंतरची छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आली. यानंतर आपल्या निवेदनात डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या या निर्णयाचं समर्थन करतानाच आता व्हेनेझुएलावर अमेरिकेचं नियंत्रण राहील, अशी भूमिका मांडली होती. अमेरिकेचं हे नियंत्रण व्हेनेझुएलामधील परिस्थिती सामान्य होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात असेल, असंही ट्रम्प यांनी नमूद केलं होतं. त्यामुळे जगभरातील अनेक देशांनी यावर चिंता व्यक्त केली होती. खुद्द अमेरिकेतदेखील प्रमुख विरोधी पक्ष असणारे डेमोक्रॅट्स आणि स्वत: ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षातूनही चिंता व्यक्त करण्यात आली होती.
व्हेनेझुएलावर नियंत्रणाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी निवेदन केल्यानंतर अवघ्या २४ तासांत अमेरिकन सरकारला या भूमिकेपासून घुमजाव केल्याचं पाहायला मिळत आहे. अमरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना व्हेनेझुएलाबाबत अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली. तसेच, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय आहे? यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी काय म्हणाले मार्को रुबियो?
सीबीसी न्यूज वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मार्को रुबियो यांनी व्हेनेझुएलामधील अमेरिकेचा हस्तक्षेप नेमका किती आणि कोणत्या बाबतीत असेल यावर उत्तर दिलं. व्हेनेझुएलामधील तेलविहिरींबाबतच्या धोरणावर काम करणे आणि त्यांचा अधिकाधिक उपयोग व्हेनेझुएलाच्या सर्वांगीण विकासासाठी करणे, व्हेनेझुएलामधील अंमली पदार्थांच्या व्यवसायाचं नेटवर्क उद्ध्वस्त करणे अशा बाबींसाठी केला जाईल, असं रुबियो म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानानंतर निर्माण झालेली अस्वस्थता कमी करण्यासाठी रुबियो यांनी रविवारी या मुलाखतीच्या माध्यमातून सारवासारव केल्याचं बोललं जात आहे.
व्हेनेझुएलामध्ये सत्तांतर होईपर्यंत तिथे अमेरिकेचं नियंत्रण असेल, असं विधान ट्रम्प यांनी केलं होतं. त्यावर मार्को रुबियो म्हणाले, “अमेरिका व्हेनेझुएलामधल्या दैनंदिन बाबींवर नियंत्रण ठेवणार नाही. व्हेनेझुएलातील अंमली पदार्थ विक्री रॅकेटच्या संदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांना विधान करायचं होतं. आम्हाला आशा आहे की व्हेनेझुएलामध्ये बदल घडून येईल. हा बदल त्यांच्या तेल उद्योगाचं व्यवस्थापन तिथल्या नागरिकांच्या फायद्यासाठी होण्यामधेच नाही, तर तिथे अंमली पदार्थ विक्रीला आळा बसण्यामध्येही दिसून येईल”, असं रुबियो यांनी नमूद केलं.
