भारतातील पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीमधील विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल ४ मे रोजी जाहीर झाले. या निवडणुकीदरम्यान सर्वाधिक चर्चा ही पश्चिम बंगालची होती. याच पश्चिम बंगालमध्ये आता भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीला मोठा धक्का दिला आहे. भाजपाने बंगालमध्ये बहुमत मिळवलं असून भाजपा तेथे लवकरच सरकार स्थापन करणार आहे.
बिहारच्या पाठोपाठ पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपाने ऐतिहासिक कामगिरी करत विजयाचा सिलसिला कायम ठेवला. एकेकाळी तृणमूल काँग्रेसचा गड मानला जाणाऱ्या बंगालमध्ये भाजपाने २९४ पैकी तब्बल २०० जागांवर विजय मिळवला. भाजपाच्या या लाटेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह त्यांच्या सरकारमधील अनेक दिग्गज मंत्र्यांचा पराभव झाला आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी या निकालाला ‘ऐतिहासिक’ आणि ‘निर्णायक’ असं म्हटलं असून ‘ते भारताचे नेते आहेत, हे भारताचं भाग्य आहे’, असं म्हटलं आहे.
आयएएनएस या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलेल्या वृत्तानुसार, व्हाइट हाऊसचे प्रवक्ते कुश देसाई यांनी म्हटलं की, “गेल्या महिन्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फोनवरून पंतप्रधान मोदींची प्रशंसा केली होती. ते (ट्रम्प) म्हणाले होते की, ते (मोदी) भारताचे नेते आहेत हे भारताचं भाग्य आहे. आता राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचं नुकत्याच झालेल्या ऐतिहासिक आणि निर्णायक निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे”, असं कुश देसाई यांनी सांगितलं आहे.
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या किती मंत्र्यांचा पराभव झाला?
गेल्या १५ वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता होती. त्यामुळे सत्ताविरोधी लाटेची शक्यता लक्षात घेता ममता बॅनर्जी यांनी आपल्या उमेदवारांच्या यादीत मोठ्या प्रमाणावर फेरबदल केले होते. त्यांनी ७४ विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट नाकारून त्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी दिली होती. त्याशिवाय मंत्रिमंडळात चांगली कामगिरी करणाऱ्या ३५ विद्यमान मंत्र्यांना ममता यांनी पुन्हा विधानसभेचे तिकीट दिले होते. मात्र, निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या ३५ पैकी तब्बल २२ मंत्र्यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे.
कोणकोणत्या मंत्र्यांचा झाला पराभव?
अर्थ आणि उद्योग खात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या मंत्री शशी पंजा यांना निवडणुकीत पराभूत झाल्या, तर शिक्षणमंत्री ब्रात्य बसू यांनाही मतदारांनी नाकारले. वित्त व प्रशासनाशी संबंधित जबाबदारी सांभाळणाऱ्या चंद्रिमा भट्टाचार्य यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला. त्याशिवाय पायाभूत सुविधा आणि ऊर्जा विभागाचे मंत्री अरूप बिस्वास, मंत्री प्रदीप मजुमदार, अल्पसंख्याक व सामाजिक संपर्क विभागाचे मंत्री सिद्दीकुल्ला चौधरी आणि उत्तर बंगाल विकास मंत्री उदयन गुहा यांच्यासह अनेक मंत्र्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
