एपी, वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी अमेरिकी काँग्रेससमोर केलेल्या दीर्घ भाषणात अमेरिकेच्या यशाचे गोडवे गायले. ‘आपण सर्वच क्षेत्रांत यशस्वी होत आहोत,’ असा दावा करत त्यांनी आपल्या धोरणांचे समर्थन केले. या वेळी ट्रम्प यांनी त्यांचाच मागील १०० मिनिटे भाषण केल्याचा विक्रम मोडला.

अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होत आहेत. रिपब्लिकन पक्षाला सर्वांनी पसंती द्यावी, यासाठी ट्रम्प यांचे प्रयत्न भाषणांतून दिसून आले. ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अमेरिकेसह जगभरात त्यांना टीकेला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेसला संबोधित केले. ट्रम्प म्हणाले, ‘आपला देश पुन्हा जिंकत आहे. हे यश इतके आहे, की त्याचे काय करायचे, ते कळत नाही. लोक मला या यशाबद्दल सांगतात.’

ट्रम्प यांनी त्यांच्या बेकायदा स्थलांतरितांवरील कारवाईचे आणि आयातशुल्काचे समर्थन केले. सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांनी लावलेले आयातशुल्क रद्द करण्याचा निर्णय दिला. तसेच, उच्च न्यायालयांनीही ट्रम्प यांची काही धोरणे रद्द करण्याचा निर्णय दिला होता. याचा उल्लेख ट्रम्प यांनी भाषणात केला. असे निर्णय रद्द करणे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. न्यायालयाच्या निर्णयांचा उल्लेख करताच डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी टाळ्या वाजविल्या.

ट्रम्प यांनी या वेळी पर्यायी कायद्यांचा वापर करून आयातीवर कर लावला जाईल, असे सांगितले. तसेच, आयातशुल्काचे धोरण एके दिवशी आधुनिक काळातील करव्यवस्था बदलेल, असे भाकीतही केले. आयातशुल्काचे धोरण आपल्या देशाला वाचविण्यासाठी असल्याचे ते म्हणाले.

आयातशुल्काच्या धोरणामुळे अमेरिकेत महागाई वाढली असल्याचा मुद्दा त्यांनी खोडून काढला. अमेरिकेतील महागाईला आणि अर्थव्यवस्थेतील समस्यांना त्यांनी माजी अध्यक्ष जो बायडेन यांना जबाबदार धरले.

इराणला इशारा

इराणला इशारा देताना ट्रम्प म्हणाले, ‘राजनैतिक प्रयत्नांद्वारे समस्या सोडविण्याकडे माझा कल असतो. मात्र, दहशतवादाचा जगातील क्रमांक एकचा पुरस्कर्ता असणाऱ्या देशाकडे अण्वस्त्रे आम्ही कधीही तयार होऊ देणार नाही.’ या वेळी गेल्या वर्षी इराणवर केलेल्या हल्ल्याचाही उल्लेख केला.

आपला देश पुन्हा जिंकत आहे. वास्तविक पाहता, आपण इतका विजय मिळवत आहोत की त्याचे काय करायचे तेच आपल्याला कळत नाही. लोक आता म्हणू लागले आहेत, “श्रीयुत अध्यक्ष, बस झाले. आम्हाला आता हे हाताळता येत नाही!” – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका