Donald Trump vs Giorgia Meloni Iran conflict and energy security latest updates : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यातील यांचे चांगल्या संबधांमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला आहे. इराण युद्ध,ऊर्जा सुरक्षा आणि पोप लिओ यांच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मेलोनी यांच्यावर कडक शब्दांत टीका केली आहे.

इटलीमधील कोरिअर डेला सेरा (Corriere della Sera) या वृत्तपत्राला दिलेल्या का मुलाखतीत ट्रम्प यांनी इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्या भूमिकेबद्दल आश्चर्य आणि निराशा व्यक्त केली आहे. “मला त्यांच्या भूमीकेमुळे धक्का बसला आहे. मला वाटलं होतं की त्या धाडसी आहेत. पण मी चुकीचा होता.” तसेच ट्रम्प पुढे म्हणाले की, त्या मी विचार केला होता त्यापेक्षा खूपच वेगळ्या आहेत. तसेच ट्रम्प यांनी संघर्षाच्या काळात अमेरिकेला पाठिंबा देण्यास त्या अपयशी ठरल्याचा आरोपही केला.

ट्रम्प यांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिकेकडून होत असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यास नकार दिल्याबद्दल मेलोनी यांच्यावर टीका केली. अमेरिका-इराण युद्धादरम्यान हा जागतिक व्यापारासाठी महत्त्वाचा हा सागरी मार्ग इराणने रोखून धरला आहे. “ते ऊर्जेसाठी जगातील सर्वाधिक किमत मोजत आहेत आणि तरीही ते होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी लढायला तयार नाहीत. सामुद्रधुनी खुली ठेवण्यासाठी ते डोनाल्ड ट्रम्पवर अवलंबून आहेत,” असे ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प यांनी पुढे बोलताना पाश्चिमात्य देशांच्या सुरक्षिततेबाबत इटलीच्या वचनबद्धतेवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, “जॉर्जिया मेलोनी यांना आम्हाला युद्धात मदत करू इच्छित नाहीत,याचे मला आश्चर्य वाटते. तुमचे राष्ट्राध्यक्ष तेल मिळवण्यासाठी काहीही करत नाहीत ही गोष्ट लोकांना आवडेल का?”

तसेच ट्रम्प यांनी आपले मेलोनी यांच्याशी खूप दिवसांपासून बोलणे झाले नसल्याचेही स्पष्ट केले, तसेच नाटोमध्ये असून अमेरिकेची मदत करण्यात त्या अपयशी झाल्याचा आरोप केला.

ट्रम्प म्हणाले की, “त्या स्वतःच अस्वीकार्य आहेत, कारण इराणकडे अण्वस्त्रे आहेत की नाही याची त्यांना फिकीर नाही आणि संधी मिळाली तर इराण दोन मिनिटांत इटलीला उडवून देईल.” मेलीनी या पूर्वीसारख्या व्यक्ती राहिल्या नाहीत आणि इटली पुन्हा कधीच पूर्वीसारखा देश बनणार नाही, असेही ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प यांची भाषा बदलली

गेल्या महिन्यातच ट्रम्प यांनी मेलोनी या एक महान नेत्या असल्याचे म्हटले होते. यावेळी इटली जवळचे मित्र राष्ट्र असल्याचेही ट्रम्प म्हणाले होते. विशेष म्हणजे, जानेवारी २०२५ मध्ये झालेल्या ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला युरोपातून उपस्थित राहणाऱ्या त्या एकमेव नेत्या होत्या.

नेमकं काय बिनसलं?

अमेरिकेच्या इराणसंबंधी भूमिकेशी मेलोनी यांनी फारकत घेतल्यानंतर अमेरिका आणि इटली यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. इटलीने अमेरिकन लढाऊ विमानांना सिसिली येथील हवाई तळ वापरू देण्यास नकार दिला होता. तसेच ट्रम्प यांनी पोप लिओ यांच्याबद्दल केलेल्या विधानावरही मेलोनी यांनी टीका केली होती. हे विधान अस्वीकार्य असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. इतकेच नाही तर मेलोनी यांनी इस्रायलबरोबरच्या इटलीच्या संरक्षण सहकार्य कराराचे ऑटोमॅटिक होणारे नूतनीकरण देखील स्थगित केले आहे.