वॉशिंग्टन : इराणविरुद्ध पुकारलेल्या युद्धामध्ये नाटोच्या सदस्य देशांसह अन्य मित्र देशांनी सहभागी होण्यास नकार दिल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला आहे. “आम्हाला नाटो देशांच्या मदतीची गरज नाही, कधीच नव्हती,” अशी आगपाखड त्यांनी ‘ट्रुथ सोशल’ या स्वतःच्या मालकीच्या समाजमाध्यमावर केली आहे. यानंतर ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमधील अध्यक्षांच्या कार्यालयात पत्रकारांशी संवादही साधला.

होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील इराणचे वर्चस्व संपवण्यासाठी मदतीला या, असे आवाहन ट्रम्प यांनी आपल्या पारंपरिक मित्र देशांना केले होते. मात्र, त्यापैकी कोणीही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, असे ट्रम्प म्हणाले. “आम्ही युद्धातून आता माघार घेण्यास तयार नाही, पण आम्ही लवकरच तेथून बाहेर पडू,” असे ते इराणबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले. आम्ही आताच बाहेर पडलो, तर इराणच्या पुनर्बांधणीसाठी १० वर्षे लागतील असा दावाही ट्रम्प यांनी केला.

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलाच्या टँकरची वाहतूक करण्यासाठी मित्र देशांकडून मदत मिळण्याबाबत ट्रम्प म्हणाले की, “अमेरिकेने केलेल्या कारवाईला नाटोचा पाठिंबा होता. इराणकडून अण्वस्त्रे काढून घेणे अतिशय महत्त्वाचे होते आणि अमेरिकेने ते काम चोखपणे पार पाडले आहे,” असा दावा ट्रम्प यांनी केला. इराणचे लष्कर, नौदल आणि हवाई दल नष्ट केल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

अमेरिकी अधिकाऱ्याचा राजीनामा

अमेरिकेच्या राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राचे संचालक (नॅशनल काऊंटर टेररिझम सेंटर) जोसेफ केंट यांनी युद्धाच्या निषेधार्थ मंगळवारी राजीनामा दिला. हा डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का मानला जात आहे.

इराणचा आपल्या देशाला कोणताही धोका नाही. इस्त्रायल तसेच त्यांचा अमेरिकेतील प्रभावी दबावगट यांच्यामुळे हे युद्ध सुरू केल्याचे स्पष्ट असल्याचे केंट यांनी समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये नमूद केले. त्यामुळेच माझी विवेकबुद्धी या युद्धाबाबत ट्रम्प प्रशासनाला पाठिंबा देऊ शकत नाही हे त्यांनी राजीनाम्याच्या कारणात स्पष्ट केले. मात्र, इराणपासून धोका होता, असा दावा ट्रम्प यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना केला. “जो केंट चांगला माणूस आहे, पण सुरक्षेच्या बाबतीत अतिशय दुर्बळ आहे,” अशी टिप्पणीही ट्रम्प यांनी केली.

अन्य टिप्पण्या

  • नाटो आम्हाला मदत न करून मूर्खपणा करत आहे, आम्हाला त्यांच्या मदतीची गरज नाही पण त्यांनी आमच्याबरोबर असायला हवे होते.
  • पश्चिम आशियातील अन्य देशांचा अमेरिकेला पाठिंबा आहे.
  • ब्रिटनला या युद्धात कोणताही धोका नव्हता पण त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला नाही. आम्हाला यश मिळाल्यावर त्यांनी मदत देऊ केली. कीर स्टार्मर पंतप्रधान होण्यापूर्वी अमेरिका आणि ब्रिटनचे संबंध चांगले होते.
  • फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल माक्राँ लवकरच पदावरून पायउतार होतील.
  • क्युबामध्ये तेलाच्या टंचाईमुळे वीजेचे अभूतपूर्व संकट ओढवले आहे. त्याबद्दल “आम्ही लवकरच क्युबा ताब्यात घेणार आहोत,” असे ट्रम्प म्हणाले.

बहुसंख्य नाटो सदस्यांनी आमच्या लष्करी कारवाईत सहभागी होण्यास नकार दिला आहे. (पण) आता आम्हाला मोठ्या प्रमाणात लष्करी यश मिळाले असल्यामुळे आम्हाला या देशांच्या मदतीची गरज नाही, कधीही नव्हती! जपान, ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण कोरियाचीही आम्हाला गर नाही. – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका.