Donald Trump On Conflict Between Israel and Iran: इस्रायल आणि इराणमधील संघर्ष कमी करण्यासाठी जी-७ नेत्यांनी तयार केलेल्या संयुक्त निवेदनाच्या मसुद्यावर स्वाक्षरी करण्यास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला आहे. या निर्णयामुळे कॅनडातील अल्बर्टा येथे सुरू असलेल्या वार्षिक शिखर परिषदेत अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.
रॉयटर्सच्या मते, मसुदा निवेदनासाठी युरोपियन अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता आणि त्यात म्हटले आहे की, इस्रायलला स्वतःचे रक्षण करण्याचा अधिकार असला तरी, इराणला अण्वस्त्र विकसित करण्याची परवानगी दिली जाऊ नये.
या संयुक्त निवेदनाच्या मसुद्याला पाठिंबा न देण्याच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाच्या वृत्ताला व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे. त्यांनी रॉयटर्सला सांगितले की, “राष्ट्रपती ट्रम्प यांच्या भक्कम नेतृत्वाखाली, अमेरिका जगभरात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचे नेतृत्व करण्यास परत आली आहे. इराणला अण्वस्त्रे मिळणार नाहीत याची निश्चिती करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काम करत राहतील.”
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीच्या सुरुवातीला ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले की, इराणने ताबडतोब चर्चेला सुरुवात करावी. “मी म्हणेन की इराण हे युद्ध जिंकू शकत नाही आणि त्यांनी आता खूप उशीर होण्यापूर्वी लगेच यावर चर्चा केली पाहिजे”. याबाबत द गार्डियनने वृत्त दिले आहे.
या संयुक्त निवेदनातून जी-७ सदस्यांमध्ये एकता असल्याचे दिसून येईल अशी अपेक्षा होती, परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याला मान्यता देण्यास नकार दिल्याने मध्य पूर्वेतील वाढत्या तणावांना कसे हाताळायचे यावरील मतभेद समोर आले आहेत.
ही शिखर परिषद सोमवारपासून अल्बर्टा येथे सुरू झाली आहे. यामध्ये कॅनडा, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि यूकेचे नेते इस्रायल-इराण संघर्ष, व्यापार तणाव आणि ऊर्जा सुरक्षा यासह जागतिक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एकत्र आले आहेत.