Donald Trump deletes Jesus Christ like AI image : पोप लिओ यांच्याशी झालेल्या राजकीय मतभेदांतून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी एक चित्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केले होते. त्यात त्यांनी येशू ख्रिस्तांच्या रुपात स्वतःला सादर केलं होतं. धार्मिक नेत्यांनी या चित्राला ‘ईशनिंदा’ (blasphemy) मानून त्यावर तीव्र आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावरून तो फोटो हटवला आहे.
ट्रम्प यांच्या ‘ट्रुथ सोशल’ प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या या AI चित्रात ते लाल आणि पांढऱ्या रंगाच्या झगा घातलेल्या रूपात दिसत होते. त्यात ते एका आजारी व्यक्तीच्या कपाळाला स्पर्श करत असून त्यांच्या हातांतून आणि डोक्यातून प्रकाश बाहेर पडताना दाखवण्यात आला होता. तर, मागून अमेरिकन ध्वज आणि काही लोक त्यांच्याकडे आदराने पाहताना दिसत होते.

ट्र्म्प यांचं स्पष्टीकरण
या चित्रावरून वाद निर्माण झाल्यावर ट्रम्प यांनी ते हटवले. मात्र, स्वतःची तुलना येशू ख्रिस्ताशी केल्याचा त्यांनी इन्कार केला. ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, “मी ते पोस्ट केले होते, पण मला वाटले की मी एक ‘डॉक्टर’ आहे आणि ते रेड क्रॉसशी संबंधित आहे. मी लोकांना बरे करतो आणि मी ते करत राहीन.”
समर्थकांकडूनही टीका
ट्रम्प यांचे खंबीर समर्थक मानल्या जाणाऱ्या काही पुराणमतवादी ख्रिश्चन नेत्यांनीही यावर टीका केली आहे. लेखिका मेगन बाशम यांनी याला ‘भयंकर ईशनिंदा’ म्हटले असून ट्रम्प यांनी यासाठी देवाकडे आणि जनतेकडे माफी मागावी, अशी मागणी केली.
आधीही केला आहे धार्मिक प्रतिमांचा वापर
ट्रम्प यांनी यापूर्वीही अशा प्रकारच्या धार्मिक प्रतिमांचा वापर केला आहे. २०२३ मध्ये एका सुनावणीदरम्यान त्यांनी स्वतःला येशू ख्रिस्ताच्या बाजूला बसलेले दाखवणारे एक रेखाचित्र शेअर केले होते. तसेच त्यांच्या समर्थकांनी अनेकदा त्यांची तुलना येशूशी केली आहे.
तज्ज्ञांच्या मते, इराणवरील बॉम्बफेकीवरून पोप लिओ यांच्याशी झालेला वाद आणि आता हे चित्र यामुळे कॅथोलिक मतदारांमध्ये ट्रम्प यांच्याबद्दल नाराजी पसरू शकते. मात्र, काही इतिहासकारांच्या मते ट्रम्प यांचे कट्टर समर्थक या घटनेनंतरही त्यांच्या पाठीशी ठाम राहतील.
