Donald Trump threatens Elon Musk : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध रंगलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प यांच्या धोरणांवरून टीका करणाऱ्या, नवा पक्ष काढण्याचा इशारा देणाऱ्या मस्क यांना यावेळी ट्रम्प यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. एका बाजूला ट्रम्प यांच्या महत्त्वकांक्षी ‘वन बिग, ब्युटीफुल बिला’वर (नवं कर व खर्च विधेयक – Tax and Spending Bill) सीनेटमध्ये मतदान चालू असताना मस्क त्यावर टीका करत आहेत. मस्क यांच्या टीकेवर ट्रम्प यांनी आज (१ जुलै) पहिल्यांदाच त्यावर टिप्पणी केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “मस्क यांना माहिती होतं की मी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणाऱ्या धोरणांच्या विरोधात आहे. प्रत्येक व्यक्तीवर इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याची सक्ती करता येणार नाही. मस्क यांना कदाचित मानवी इतिहासातील कोणत्याही व्यक्तीपक्षा अधिक अनुदान मिळू शकतं. मात्र, अनुदानाशिवाय त्यांना त्यांचं दुकान बंद करून दक्षिण आफ्रिकेला परत जावं लागेल. अनुदानाशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर रॉकेट लॉन्चर, उपग्रह व इलेक्ट्रिक कार्सचं उत्पादन होणार नाही. तसेच आपण खूप पैसे वाचवू शकतो.”

मस्क यांनी ट्रम्प यांना दिलेला नवा पक्ष काढण्याचा इशारा

मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा दिला होता की One Big, Beautiful Bill सीनेटने पारित केल्यास त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी स्वतःचा राजकीय पक्ष काढेन. त्यावर ट्रम्प यांनी आज प्रतिक्रिया दिली.

एलॉन मस्क यांनी दोन दिवसांपूर्वी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोल (मतदान) घेतला होता. याद्वारे त्यांनी अमेरिकन जनतेला नव्या राजकीय पक्षाबाबत त्यांचं मत विचारलं होतं. यावर हजारो नेटकऱ्यांनी मस्क यांच्या नव्या पक्षाच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. नव्या पक्षासाठी प्रोत्साहन दिलं आहे. त्यांनंतर मस्क यांनी पक्षासाठी ‘अमेरिका पार्टी’ या नावाची घोषणा देखील केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एलॉन मस्क यांचा दक्षिण आफ्रिकेशी संबंध काय?

एलॉन मस्क हे अमेरिकेतील मोठे उद्योगपती असले तरी ते मूळचे दक्षिण आफ्रिकन आहेत. त्यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला होता. तिथेच त्यांचं बालपण गेलं. १९८९ साली मस्क हे १७ वर्षांचे असताना त्यांनी दक्षिण आफ्रिका सोडली आणि ते कुटुंबासमवेत कॅनडाला गेले. काही वर्षे कॅनडात राहिल्यानंतर मस्क यांचं कुटुंब अमेरिकेत राहायला गेलं आणि तिथेच स्थायिक झालं. मस्क यांनी पुढे अमेरिकेतच त्यांचा व्यवसाय सुरू केला.