अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाला तब्बल तीन महिने उलटले आहेत, पण या तीन महिन्यांच्या कालावधीत या युद्धाबाबत अद्याप देखील कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. युद्धविरामाची घोषणा करण्यात आलेली असल्यामुळे सध्या युद्ध सुरू नसलं तरी तणाव कायम आहे. मध्य पूर्वेतील या तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमधून होणाऱ्या जागतिक व्यापाराला मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत आणि याचाच परिणाम जगातील अनेक देशांवर होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारासाठी चर्चा सुरू आहेत, पण अद्याप दोन्ही देशात शांतता करारातील अटींवर एकमत झालेलं नाही. या घडामोडी घडत असतानाच काही दिवसांपूर्वी इराण युद्धावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे प्रमुख बिन्यामिन नेतान्याहू यांच्यात मतभेद निर्माण झाल्याची माहिती समोर आली होती. एवढंच नाही तर “मी नसतो तर तुम्ही तुरुंगात असता”, अशा शब्दांत डोनाल्ड ट्रम्प यांनी बिन्यामिन नेतान्याहू यांना सुनावलं देखील होतं.
त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प आणि बिन्यामिन नेतान्याहू यांच्यातील मतभेद आणखी वाढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण इस्रायल हेरगिरी करत असल्याचा अमेरिकेला संशय असल्याचं वृत्त समोर आलं आहे. इस्रायलच्या दौऱ्यादरम्यान अमेरिकी अधिकारी बर्नर फोन वापरत आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या पेंटागॉनला इस्रायलकडून अमेरिकी अधिकाऱ्यांच्या हेरगिरीची भीती वाटतेय का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या संदर्भातील वृत्त एनबीसी न्यूजच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे.
वृत्तानुसार, एका अहवालानुसार, खबरदारीचा उपाय म्हणून अमेरिका अधिक काळजी घेत आहे. तसेच इस्रायलच्या दौऱ्यादरम्यान अमेरिकेचे अधिकारी बर्नर फोन, तात्पुरतं संगणक आणि विशेषतः उच्चस्तरीय भेटींच्या दरम्यान अधिक काळजी घेत आहे. माजी राजनैतिक अधिकारी, गुप्तचर अधिकारी आणि सुरक्षा तज्ञांनी याबाबत सांगितलं की, वरिष्ठ अमेरिकी अधिकारी इस्रायलमध्ये असताना हॉटेलच्या खोल्यांमध्ये आणि इतर संभाव्य असुरक्षित ठिकाणी संवेदनशील विषयांवर चर्चा करणं देखील टाळत आहेत.
“अमेरिका इस्रायलला भेट देताना आधीच अतिरिक्त खबरदारी घेत आहे”, असं एका विद्यमान अधिकाऱ्याने सांगितल्याचं वृत्तात म्हटलं आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि बिन्यामिन नेतान्याहू यांच्यातील मतभेद वाढत आहेत का? डोनाल्ड ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यात बिनसलं आहे का? अमेरिका इस्रायलवर अविश्वास का दाखवत आहे? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.

इराणबरोबरच्या युद्धाच्या भविष्यातील वाटचालीवरून डोनाल्ड ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यातील वाढत्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही आठवड्यांत काही निष्कर्ष काढण्यात आले आहेत. त्यामध्ये डीआयएने (DIA) एक अंतर्गत सूचना जारी करत त्यामध्ये ७ पानांचा एक दस्तऐवज जोडला आहे. त्यामध्ये इस्रायलच्या गुप्तचर माहिती गोळा करण्याच्या क्षमतेबद्दल चिंता व्यक्त करण्यात आल्याचं म्हटलं आहे.
एका अधिकाऱ्याच्या मते या अहवालात असा निष्कर्ष काढण्यात आला की, इस्रायलची मानवी हेरगिरी आणि तांत्रिक गुप्त माहिती संकलन करण्याची क्षमता, या दोन्ही गोष्टी अतिशय उच्च पातळीवर कार्यरत असल्याचा संशय आहे. कारण या दस्तऐवजात वाढलेल्या चिंतेस कारणीभूत ठरलेल्या काही घटनांचा तपशील दिल्याचंही सांगितलं जात आहे.
दरम्यान, सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजच्या संरक्षण आणि सुरक्षा विभागाच्या उपाध्यक्ष एमिली हार्डिंग यांनी इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेचं वर्णन ‘अति-आक्रमक’ असं केलं आहे. “आम्ही काय करत आहोत? यात त्यांना (इस्रायलला) प्रचंड रस आहे”, असं एमिली हार्डिंग यांनी म्हटल्याचं एनबीसी न्यूजने एका अहवालात म्हटलं आहे.
इस्रायलने अमेरिकेचे आरोप फेटाळले
दरम्यान, इस्रायलने अमेरिकेचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. वॉशिंग्टनमधील इस्रायली दूतावासाच्या प्रवक्त्याने अमेरिकी अधिकाऱ्यांवर हेरगिरी केल्याचे दावे पूर्णपणे खोटे असल्याचं म्हटलं आहे. “इस्रायल अमेरिकी संस्थांवर गुप्त माहिती गोळा करत नाही, अमेरिकी सरकारी अधिकाऱ्यांवर तर नाहीच. इस्रायलच्या गुप्तचर कारवाया मित्र राष्ट्रांऐवजी शत्रू राष्ट्रांवर निर्देशित असतात”, असं इस्रायली दूतावासाच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे.

“मी नसतो तर तुम्ही तुरुंगात असता!”, ट्रम्प नेतान्याहूंवर का संतापले होते?
काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी बिन्यामिन नेतान्याहू यांच्याशी फोनवरून संवाद साधत असताना तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचीही माहिती समोर आली होती. इस्रायलने आपल्या सैन्याला लेबनॉनमध्ये शिरण्याचे आदेश दिल्यानंतर इराण आणि अमेरिकेदरम्यानचा शस्त्रसंधीचा करार धोक्यात आला होता. इस्रायलने दिवसभरात दक्षिण बेरुतवर हल्ले वाढवण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर इस्रायलने लेबनॉनवरील हे हल्ले थांबवले नाहीत, तर इराण आणि अमेरिकेदरम्यानचा शस्त्रसंधी करार लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता आहे, असं इराणने म्हटलं होतं.
अमेरिकेबरोबरच्या कोणत्याही करारासाठी लेबनॉनमधील इस्रायलचे हल्ले थांबवणं ही एक या कराराची प्रमुख अट असेल, असं इराणने स्पष्ट केलं होतं. इस्रायलने लेबनॉनवर बॉम्बहल्ला केल्यानंतर इराणने अमेरिकेबरोबरची चर्चा स्थगित करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे लेबनॉनवरील हल्ले थांबवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी बिन्यामिन नेत्यानाहू यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता. यावेळी ते वेडेपणा करत आहेत, असे ट्रम्प म्हणाले होते. “तू पूर्णपणे वेडा आहेस. जर मी नसतो तर तू तुरुंगात असतास. मी तुला वाचवत आलो आहे. प्रत्येकजण तुझा तिरस्कार करतो. तुझ्या कृतीमुळे प्रत्येकजण आता प्रत्येकजण इस्रायलचा द्वेष करु लागला आहे”, अशा शब्दांत ट्रम्प यांनी नेत्यानाहू यांना सुनावलं होतं.
