वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अब्जाधीश उद्याोगपती इलॉन मस्क यांच्यातील दीर्घकाळापासून असलेली मैत्री शत्रुत्वात बदलण्याची चिन्हे आहेत. ट्रम्प प्रशासनाच्या नव्या विधेयकांवर नाराजी व्यक्त करत मस्क सरकारमधून बाहेर पडल्यानंतर दोघेही एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. ‘‘माझ्याशिवाय ट्रम्प निवडून आले नसते,’’ अशी टीका मस्क यांनी केल्यानंतर ट्रम्प यांनी मस्क यांचे सरकारी अनुदान आणि करार रद्द करण्याची धमकी दिली.
डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांची मैत्री सवश्रृत आहे. दोघेही जगातील प्रभावशाली व्यक्ती. एक शक्तिशाली राजकारणी तर दुसरा सर्वाधिक धनाढ्य व्यक्ती. मात्र दोघांमध्येही मतभेद झाले असून त्याचे रूपांतर शाब्दिक युद्धात झाले. ट्रम्प यांच्या नव्या कर व खर्च विधेयकाबाबत मस्क यांनी तक्रार केल्यानंतर या वादास सुरुवात झाली, ज्याकडे सुरुवातील ट्रम्प यांनी दुर्लक्ष केले. मात्र मस्क त्यांच्या स्वमालकीच्या ‘एक्स’ समाजमाध्यामावर त्याबाबत टीका करत राहिल्याने ट्रम्प यांनीही शाब्दिक हल्ले करण्यास सुरवात केली. या कर विधेयकात विद्याुत वाहनांना मिळणारी सवलत रद्द करण्यात आल्याने मस्क नाराज झाल्याचे बोलले जाते.
समाज माध्यामांवर हल्लाबोल
ट्रम्प प्रशासनातून मस्क बाहेर पडल्यानंतर दोघांमधील दररोजच शाब्दिक हल्ले होत आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षाच्या समर्थनासाठी मस्क यांनी कोट्यवधी डॉलर खर्च केले होते. त्यामुळे ‘माझ्याशिवाय ट्रम्प निवडणूक हरले असते,’ अशी टीका करत ट्रम्प यांचा उल्लेख मस्क यांनी ‘कृतघ्न’ असा केला.
रिपब्लिकन पक्षाला सेनेटमध्ये केवळ ५१ किंवा ४९ मतांनी आघाडी मिळाली असती, असे मस्क म्हणाले.समाज माध्यमावर दुसऱ्या पोस्टमध्ये मस्क यांनी दावा केला की ट्रम्प यांचे आयात शुल्क या वर्षाच्या अखेरीस अमेरिकेला मंदीच्या खाईत ढकलेल.
मस्क यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत डोनाल्ड ट्रम्प यांनी मस्क यांच्या कंपन्यांना मिळणारे अनुदान आणि सरकारी ठेके रद्द करण्याची धमकी दिली आहे.
‘‘मस्क यांचे सरकारी अनुदान व करार रद्द करणे, हा अर्थसंकल्पातील अब्जावधी डॉलर वाचवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे,’’ असे ते म्हणाले. मस्क यांच्या कंपन्यांचे अमेरिकी प्रशासनाबरोबर अनेक व्यावसायिक करार आहे. मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’चा बहुतेक कारभार सरकारी करारांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.
महाभियोग चालवण्याची धमकी
ट्रम्प-मस्क वाद गुरुवारी रात्री आणखी चिघळला. मस्क यांच्या कंपन्यांचे सरकारी अनुदान व करार रद्द करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिल्यानंतर मस्क यांनी एक्स वर ‘ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवावा नि उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांना अध्यक्ष बनवावे’ या सूचनेस ‘होय’ असे उत्तर दिले.
‘ड्रॅगन स्पेसक्राफ्ट बंद करू’
ट्रम्प यांच्या धमक्यांमुळे संतप्त झालेल्या मस्क यांनी ‘स्पेसएक्स’चे ड्रॅगन स्पेसक्राफ्ट बंद करण्यास सुरुवात करू, अशी धमकी दिली. ड्रॅगन हे सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अंतराळवीर पाठवण्यास सक्षम असलेले एकमेव अमेरिकी अंतराळयान आहे. मात्र काही तासांतच मस्क यांनी हा निर्णय मागे घेत असल्याचे सांगितले.
समेटाचा विचार फेटाळला
मस्क यांच्याशी झालेल्या त्यांच्या जाहीर मतभेदानंतर आणि शत्रुत्वात विराम येण्याची शक्यता असल्याच्या संकेतांमध्ये, डोनाल्ड ट्रम्प यांनी समेट करण्याचा विचार फेटाळून लावला. मस्क यांच्यशी बोलण्यात विशेष रस नाही, असे ट्रम्प म्हणाले. मस्क यांची मनस्थिती बिघडलेली आहे. गुरुवारी दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी झाल्यानंतर शांतता करारात मध्यस्थी करण्यासाठी व्हाईट हाऊसने शुक्रवारी मस्क यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचे नियोजन केले होते, असे काही माध्यमांनी वृत्त दिले होते. मात्र असा कोणताही दूरध्वनी झाला नसल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले.
स्टारलिंकला भारतात परवाना
इलॉन मस्क यांच्या मालकीच्या स्टारलिंक या उपग्रह इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपनीला भारतात परवाना मिळाला आहे. केंद्र सरकारच्या दूरसंपर्क मंत्रालयाने हा परवाना दिला असून त्यामुळे स्टारलिंकचा भारतामध्ये व्यावसायिक इंटरनेट सेवा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वनवेब आणि रिलायन्स जिओ यांच्यानंतर असा परवाना मिळवणारी स्टारलिंक ही तिसरी कंपनी आहे. परवाने दिल्यानंतर या कंपनीला स्पेक्ट्रमचे वाटप केले जाईल, असे केंद्रीय दूरसंपर्क मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी गुरुवारी सांगितले.