White House Correspondents’ Dinner incident : वॉशिंग्टन हिल्टन येथे व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डट्स डिनर दरम्यान शनिवारी रात्री गोळीबार झाला. यावेळी या कार्यक्रमाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही उपस्थित होते. खचाखच भरलेल्या या कार्यक्रमातून डोनाल्ड ट्रम्प यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. अध्यक्ष ट्रम्प, फर्स्ट लेड मेलानिया ट्रम्प आणि जे.डी वान्स यांना विशेष पथकांनी तत्काळ बॉलरुममधून बाहेर काढून एका सुरक्षित ठिकाणी हलवले. दरम्यान, शुटरला ताब्यात घेतलं असून या गोळीबाराशी इराणचा काहीही संबंध नसेल, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.
अधिकृत माहितीनुसार, शॉटगन बाळगलेल्या एका व्यक्तीने कार्यक्रमाच्या मुख्य सुरक्षा तपासणी क्षेत्राजवळ घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. एफबीआयच्या (FBI) एका अधिकाऱ्याने सांगितले की, संशयिताने सिक्रेट सर्व्हिस एजंटवर गोळी झाडली, परंतु ती गोळी संरक्षक कवचाला (protective gear) लागल्याने एजंटला कोणतीही इजा झाली नाही. गोळीबाराचा आवाज येताच उपस्थितांमध्ये शांतता पसरली आणि त्यानंतर “खाली झुका, खाली झुका!” असे ओरडण्याचे आवाज ऐकू आले. शेकडो पाहुण्यांनी टेबलांखाली आश्रय घेतला, तर सशस्त्र सिक्रेट सर्व्हिस अधिकारी जेवणाच्या हॉलमध्ये दाखल झाले. सुरक्षा रक्षकांनी बाहेर नेण्यापूर्वी ट्रम्प आणि मेलानिया व्यासपीठाच्या मागे झुकलेले दिसले.
या गोंधळात वेटिंग स्टाफ हॉलच्या समोरच्या बाजूला पळताना दिसला. थेट प्रक्षेपणात (Live feed) मेलानिया ट्रम्प गर्दीतील हालचाली पाहून चिंताग्रस्त झाल्याचे दिसून आले. सुरक्षेचा उपाय म्हणून रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर, डग बर्गुम आणि मार्को रुबिओ यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुरक्षा पथकांनी जमिनीवर झोपण्यास सांगितले. त्यानंतर कॅबिनेट मंत्र्यांना एकामागून एक बाहेर काढण्यात आले.
या घटनेतील संशयित आरोपीला जिवंत ताब्यात घेण्यात आले असून या घटनेला ट्रम्प यांनी स्वतः दुजोरा दिला आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ प्लॅटफॉर्मवर सुरक्षा दलांच्या धाडसी कारवाईचे कौतुक केले. “वॉशिंग्टन डी.सी. मधील ही एक मोठी संध्याकाळ होती. सिक्रेट सर्व्हिस आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी अतिशय जलद आणि चोख काम केले”, असं त्यांनी लिहिले.
ट्रम्प म्हणाले, शो मस्ट गो ऑन
कार्यक्रमाला सुमारे २,६०० पाहुणे उपस्थित होते. सिक्रेट सर्व्हिसचे प्रवक्ते अँथनी गुग्लिएल्मी यांनी सांगितलं की ट्रम्प, प्रथम महिला, उपराष्ट्राध्यक्ष आणि सर्व कॅबिनेट मंत्री सुरक्षित आहेत. ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांनी कार्यक्रम पुढे चालू ठेवण्याची (“LET THE SHOW GO ON”) सूचना केली होती, परंतु सुरक्षा यंत्रणांच्या सल्ल्यानुसार तो थांबवण्यात आला. हा कार्यक्रम पुढील ३० दिवसांत पुन्हा आयोजित केला जाईल आणि लवकरच यावर पत्रकार परिषद घेतली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. हल्ल्यामागचा उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नसून तपास सुरू आहे.
