Donald Trump Pam Bondi Epstein Files: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या लहरी आणि आत्मसंतुष्ट वृत्तीचे परिणाम सध्या अवघ्या जगासमोर दिसत आहेत. इराणविरुद्ध इस्रायलच्या बाजूने डोनाल्ड ट्रम्प उतरल्यानंतर अवघ्या जगावरच त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर इस्रायल-इराण युद्धाच्या निमित्ताने जगभरात कच्च्या तेलाच्या तुटवड्यासाठी कारणीभूत ठरलेले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या याच स्वभावाचा फटका आता अमेरिका सरकारमधल्याच उच्चाधिकाऱ्यांना बसत असल्याचं दिसत आहे. गेल्या महिन्याभरात डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी सरकारमधल्या तीन उच्चाधिकाऱ्यांची उचलबांगडी केली आहे. या यादीत ताजी भर पडली ती डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या अ‍ॅटर्नी जनरल पॅम बाँडी यांची!

गेल्या महिन्यात ५ मार्च रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी होमलँड सेक्युरिटी सेक्रेटरी क्रिस्टि नोएम यांना पदावरून पायउतार होण्याचे आदेश दिले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्थलांतरितांबाबतच्या धोरणाच्या अंमलबजावणीत आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. नुकतीच ट्रम्प यांनी अमेरिकेचे लष्करप्रमुख रँडी जॉर्ज यांच्यासह लष्करातील तीन वरीष्ठ अधिकाऱ्यांना बडतर्फ केल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर पॅम बाँडी यांच्या गच्छंतीमुळे डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध त्यांचंच प्रशासन असं चित्र अमेरिकेत निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची पॅम बाँडी यांच्याबाबत पोस्ट

ट्रम्प यांनी त्यांच्या Truth वरील अधिकृत अकाऊंटवरून पॅम बाँडी यांना पदावरून हटवल्याची माहिती जगजाहीर केली आहे. “पॅम बाँडी या अमरिकेच्या निस्सिम राष्ट्रभक्त असून माझ्या निष्ठावान सहकारी आहेत. गेल्या वर्षभरात त्यांनी माझ्या अ‍ॅटर्नी जनरल म्हणून चांगली कामगिरी बजावली आहे. अमेरिकेतील गुन्हे विश्वाचा बिमोड करण्यात पॅम बाँडी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पॅम यांना नजीकच्या भविष्यात खासगी क्षेत्रातील अधिक महत्त्वाची भूमिका सोपवली जाईल”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Pete Hegseth ordered US Army Chief General Randy George
इराणबरोबर युद्ध सुरू असतानाच अमेरिकेत मोठ्या घडामोडी; अमेरिकेने लष्करप्रमुखांना हटवलं, सक्तीची निवृत्ती घेण्याचे आदेश, (फोटो-फायनान्शिअल एक्स्प्रेस)

पॅम बाँडी यांच्याजागी कोण?

दरम्यान, अ‍ॅटर्नी जनरल या महत्त्वाच्या पदासाठी पॅम बाँड यांच्याजागी त्यांचेच सहकारी डेप्युटी अ‍ॅटर्नी जनरलल टॉड ब्लेंच यांची नियुक्ती करण्यात आल्याचंही डोनाल्ड ट्रम्प यांनी याच पोस्टमध्ये नमूद केलं आहे. “आपले डेप्युटी अ‍ॅटर्नी जनरल आणि कायद्याची उत्तम जाण असणारे टॉड ब्लेंच यांची अ‍ॅटर्नी जनरल पदावर नियुक्ती करण्यात आली आहे”, असं ट्रम्प पोस्टमध्ये म्हणाले.

पॅम बाँडी यांची उचलबांगडी का महत्त्वाची?

बाँडी यांच्या हकालपट्टीमागे डोनाल्ड ट्रम्प यांचा त्यांच्यावरील राग कारणीभूत ठरल्याचं मानलं जात आहे. एपस्टिन फाईल्स प्रकरण योग्यरीत्या हाताळलं नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पॅम बाँडी यांच्यावर एपस्टिन फाईल्ससंदर्भात मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली होती. एपस्टिन फाईल्स जगजाहीर करण्याच्या प्रक्रियेत बाँडी यांनी हयगय केल्याचा आरोप करण्यात आला. मेरिलँडचे डेमोक्रॅटिक पक्षाचे लोकप्रतिनिधी जेमी रस्किन यांनी “बाँडी यांनी अमेरिकेच्या कायदे विभागाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या सूडाचं साधन बनवून टाकलं” अशी टीका यासंदर्भात केली होती.

पॅम बाँडी यांची काय भूमिका?

दरम्यान, बाँडी यांनी मात्र त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. एपस्टिन फाईल्स जगजाहीर करण्याच्या कृतीचं त्यांनी समर्थन केलं आहे. अमेरिकेतील याआधीच्या सर्व राष्ट्राध्यक्षांपेक्षा डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रशासन अधिक पारदर्शीपणे काम करत आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे. या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘फेव्हरेट’ अधिकाऱ्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या पॅम बाँडी यांच्या हकालपट्टीमुळे नेमकं ट्रम्प प्रशासनात चाललंय काय? याची सध्या चर्चा होऊ लागली आहे.