Donald Trump On US Supreme Court : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या धोरणाबाबत अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा निर्णय दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेले टॅरिफ सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवले असून ६-३ अशा बहुमताने न्यायालयाने निकाल दिला आहे.

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावरील सुनावणी दरम्यान एक महत्वाची टिप्पणी करत ट्रम्प यांनी आयातशुल्क लागू करताना त्यांच्या अधिकाराच्या मर्यादा ओलांडल्या असल्याचंही म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयावर आता डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय हा अपमानकारक असल्याचं म्हणत माझ्याकडे पर्यायी योजना (प्लॅन बी) असल्याचंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान, व्हाईट हाऊसकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अद्याप अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला?

डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेले सर्व आयात शुल्क (टॅरिफ) बेकायदेशीर असल्याचं अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावरील सुनावणी दरम्यान महत्वाची टिप्पणी करत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना टॅरिफ लावण्याचा अधिकार नसल्याचं म्हटलं आहे.

विशेष अध्यक्षीय अधिकाराअंतर्गत विविध देशांच्या वस्तुमालावर आयातशुल्क अर्थात टॅरिफ आकारण्याचा अधिकार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नाही, असं अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालया या निर्णयामुळे आता ट्रम्प यांनी जवळपास १०० हून अधिक देशांवर एकतर्फी लादलेल्या आयातशुल्काबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. तसेच अनेक व्यापार करारही अडचणीत आले आहेत. भारताबरोबर करार आणि भारतावर अमेरिकेने आकारलेल्या व पुढे १८ टक्क्यांपर्यंत कमी केलेल्या १८ टक्के टॅरिफचे काय होणार? याबाबतही अनिश्चितता आहे.

भारतावर १८ टक्के टॅरिफ

भारताशी दीर्घकाळ रखडलेला व्यापार करार पूर्ण केल्यानंतर अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे. भारताने अमेरिकेला ५०० अब्ज डॉलर्सची उत्पादने खरेदी करण्याचे आश्वासन दिले, तर भारतीय वस्तूंवरील टॅरिफ कमी करून १८ टक्क्यांवर आणण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला आहे.