Donald Trump Imposes 100% Tariff On Foreign Films: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी परदेशात निर्मिती केल्या जाणाऱ्या सर्व चित्रपटांवर १०० टक्के टॅरिफ आकारण्याची घोषणा केली आहे. यावेळी ट्रम्प यांनी असा दावा केला की, अमेरिकेतील चित्रपट उद्योग अत्यंत वेगाने मृतावस्थेत जात आहे.

ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला निर्णय जाहीर करताना म्हटले आहे की, त्यांनी वाणिज्य विभाग आणि युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्हला अमेरिकेबाहेर बनवल्या जाणाऱ्या चित्रपटांवर १०० टक्के टॅरिफ तत्काळ लागू करण्याचे अधिकार दिले आहेत.

राष्ट्रीय सुरक्षेला धोका…

“इतर देश आपल्या चित्रपट निर्मात्यांना आणि स्टुडिओना अमेरिकेपासून दूर नेण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. हॉलिवूड आणि अमेरिकेतील इतर अनेक क्षेत्रे उद्ध्वस्त होत आहेत. हा इतर देशांचा एकत्रित प्रयत्न आहे आणि म्हणूनच हा प्रकार राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे”, असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.

व्यापार युद्धाचा हॉलिवूडला फटका

हॉलिवूड आधीच अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धाच्या परिणामांचा सामना करत आहे. अशात चीनने अमेरिकेतील चित्रपटांचा कोटा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपट बाजारपेठेतील टॅरिफ युद्धाचा परिणाम वॉल्ट डिस्ने कंपनी, पॅरामाउंट ग्लोबल आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यासारख्या महत्त्वाच्या पाश्चात्य स्टुडिओवर होण्याची शक्यता आहे.

चीनकडून टीका

द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, १० एप्रिल रोजी चायना फिल्म ॲडमिनिस्ट्रेशनने एका निवेदनात म्हटले आहे की, “चीनवर गैरमार्गाने टॅरिफ लादण्याच्या अमेरिकन सरकारने केलेल्या चुकीच्या कृतीमुळे स्थानिक प्रेक्षकांची अमेरिकन चित्रपटांबद्दलची पसंती आणखी कमी होईल.”

अमेरिकेनंतर, चीन हा चित्रपट उद्योगासाठी दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. असे असले तरी, अलिकडच्या काळात, चिनी चित्रपटांनी हॉलिवूड चित्रपटांपेक्षा उत्तम कामगिरी केली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिलच्या सुरुवातीला भारतासह जगभरातल्या अनेक देशांवर टॅरिफ लागू केले होते. यावेळी त्यांनी सर्व देशांवर सरसकट १० टक्के कर लागू होते. तर, काही निवडक देशांवर Resiprocal Tariff लागू करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी भारतावर २६ टक्के टॅरिफ लागू केला होता. मात्र चीनवर ३४ टक्के तर व्हिएतनामवर ४६ टक्के इतके टॅरिफ लादले होते. पण, त्यानंतर ट्रम्प यांनी काही टॅरिफ आकरण्याच्या निर्णयाला काही देशांसाठी स्थगिती दिली होती.