Donald Trump Iran Threat: मागच्या आठवड्यात इस्लामाबाद येथे इराणशी युद्धविरामावरील दुसऱ्या टप्प्यातील चर्चा फिस्कटल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे. ‘ते आता अधिक काळ चांगला माणूस म्हणून वावरणार नाहीत’, असे सांगून ट्रम्प यांनी इराणवर दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. इराणने अणुकरारावरील चर्चा लवकरात लवकर पूर्ण करून करार करावा, यासाठी ट्रम्प यांनी दबाव टाकला आहे.
ट्रम्प यांनी नेहमीप्रमाणे ट्रुथ या सोशल मीडिया साईटवर एक पोस्ट शेअर करत हा इशारा दिला आहे. “इराणने दोन दगडावर पाय ठेवू नयेत. अणुकरार मागे घेण्याबाबतचा करार कसा असावा, हे त्यांना कदाचित माहीत नाही. त्यांनी लवकर सुधारावे”, असा शब्दांत ट्रम्प यांनी इराणला तंबी दिली आहे.
ट्रम्प यांनी आपल्या पोस्टसह एक फोटो अपलोड केला आहे. ज्यात ते सिनेमातील दृश्याप्रमाणे हातात बंदूक घेऊन लढाईच्या मैदानात उभे असल्याचे दिसत आहे. या फोटोवर “नो मोर मिस्टर नाइस गाय”, असा संदेश लिहिला आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर पुन्हा एकदा नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केल्यानंतर ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला होता. अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या बाहेर समुद्रात निर्माण केलेले अडथळे दूर करावेत, अशी मागणी इराणने केली होती. यासाठी त्यांनी पुन्हा एकदा होर्मुझवर ताबा मिळवला होता. अमेरिका आणि इराणमध्ये सध्या युद्धविराम आहे. मात्र, अमेरिकी नौदलाने इराणच्या बंदरांची नाकेबंदी केल्यामुळे इराणला आपल्या तेलाची विक्री करणे कठीण जात असून त्यामुळे त्या देशावरील आर्थिक ताण आणखी वाढला आहे.
अण्वस्त्रबंदीसाठी अमेरिकेचा दबाव
ट्रम्प यांची ताजी धमकी ही इराणवर दबाव टाकण्यासाठी एक मुत्सद्दी खेळी असल्याचे म्हटले जात आहे. इराणे अणुकरारावर स्वाक्षरी करावी, युरेनियमचे समृद्धीकरण थांबवावे आणि भविष्यात अण्वस्त्रे विकसित करू नयेत, यासाठी अमेरिकेचा दबाव वाढत आहे. तसेच अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धबंदीची चर्चा वारंवार ठप्प होत आहे. दोघांनीही एकमेकांवर आधीचे मुद्दे बदलल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केले असल्याचे म्हटले जाते.
मागच्या आठवड्यात ट्रम्प यांनी लांबलेल्या चर्चेवरून संताप व्यक्त करताना म्हटले होते की, युद्धबंदीचा करार पुढे गेला तर नंतर अमेरिकेच्या अटीवर करार करावा लागेल. तसेच युद्ध समाप्त करण्यासाठी ट्रम्प घाई करत असल्याच्या आरोपावर स्पष्टीकरण देत असताना ट्रम्प यांनी सोशल मीडियावर म्हटले, “माझ्याकडे जगभराचा वेळ आहे. पण इराणची वेळ संपत आली आहे.”
ट्रम्प यांनी पुढे असाही दावा केला की, इराणची लष्करी ताकद बरीच कमी झाली आहे. तसेच अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीची केलेली नाकाबंदी तशीच राहिल. एका वेगळ्या पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले, इराणच्या नौदलाला आम्ही जलसमाधी दिली आहे. त्यांचे हवाई दलही उध्वस्त झाले आहे. त्यांची हवाई यंत्रणा, रडार नष्ट झाले आहेत. त्यांचे नेते आता या जगात नाहीत. आता वेळही त्यांच्याबाजूने नाही.
दरम्यान वॉल स्ट्रिट जर्नलने दिलेल्या बातमीनुसार, ट्रम्प यांनी इराणने अण्वस्त्र शरणागती पत्करावी यासाठी दीर्घकालीन नाकेबंदी करण्याची तयारी करण्यास सांगितले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ते इराणची तेल निर्यात बंद करू इच्छितात, जेणेकरून इराणच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल. होर्मुझच्या सामुद्रधुनीतल अमेरिकन नौदलाच्या अडथळ्यांमुळे इराणला आपली जहाजे बाहेर काढणे अवघड होऊन बसले आहे.
युद्धसमाप्तीसाठी इराणचा नवा प्रस्ताव
इराणकडून अमेरिकेला युद्धसमाप्तीसाठी नवा प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. नव्या प्रस्तावामध्ये होर्मुझची सामुद्रधुनी जहाजांच्या दळणवळणासाठी पुन्हा खुली करण्याचा मुद्दा मांडण्यात आला आहे. अमेरिकेतील स्थानिक वृत्तसंस्था Axios ने या संदर्भातील वृत्त दिले आहे. वृत्तानुसार, इराणने होमुझची सामुद्रधुनी तातडीने खुली करण्याचा प्रस्ताव अमेरिकेला सादर केला. इराणच्या आण्विक कार्यक्रमाबाबतची चर्चा नंतर होईल, पण सध्या होर्मुझ खुली करून आखातात चालू असलेले युद्ध तातडीने समाप्त केले जावे, असा प्रस्ताव इराणने ठेवला.
