Donald Trump G7 Summit Iran Surrender Claim latest news : इस्रायल आणि अमेरिकेने इराणविरोधात हल्ले वाढवले असून तिन्ही देशांनी आपली ताकद पणाला लावली आहे. या युद्धात कोण शरणागती पत्करणार याकडे सर्वांचं लक्ष असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. जी ७ च्या नेत्यांबरोबर फोनवर बोलताना त्यांनी इराणबाबत मोठा दावा केला.
डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा काय?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ११ मार्च रोजी जी ७ नेत्यांबरोबर व्हर्च्युअल बैठक झाली. या बैठकीत त्यांनी इराण युद्धाबाबत मोठा दावा केला आहे. इराण शरणागती पत्करण्याच्या तयारीत आहे, असं त्यांनी म्हटलंय. AXIOS ने यासंदर्भतील वृत्त दिलंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी सकाळी जी ७ कॉलवर ऑपरेशन एपिक फ्युरीच्या निकालांबाबत म्हणाले की “आपल्या सर्वांना धोका असलेल्या कर्करोगापासून मुक्तता मिळवली आहे.”
नेता कोण हेच माहिती नाही
इराण शरणागती पत्कारण्याच्या तयारीत असल्याचा दावा करताना, त्यांनी असेही सुचवले की तेहरानमध्ये असा कोणताही अधिकारी जिवंत राहिलेला नाही ज्याच्याकडे निर्णय घेण्याची शक्ती असेल. “नेता कोण आहे हे कोणालाही माहिती नाही, त्यामुळे कोणीही आत्मसमर्पणाची घोषणा करू शकत नाही”, असं ट्रम्प म्हणाले.
दरम्यान, इतर सर्व नेत्यांनी ट्रम्प यांना युद्ध लवकर संपवण्याचे आवाहन केले आणि होर्मुझची सामुद्रधुनी शक्य तितक्या लवकर सुरक्षित केली पाहिजे यावर भर दिला, असे कॉलबद्दल माहिती देणाऱ्या दोन अधिकाऱ्यांनी अॅक्सिओसला सांगितले. ट्रम्प म्हणाले की होर्मुझमधील परिस्थिती सुधारत आहे आणि व्यावसायिक जहाजांनी या भागात पुन्हा काम सुरू करावे, असे कॉलबाबत माहिती असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
नेत्यांच्या आवाहनावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ते ज्या मुख्य प्रश्नावर काम करत आहेत तो वेळेचा आहे. त्यांनी कोणतीही अंतिम मुदत दिली नाही. परंतु पाच वर्षांत इराणसोबत आणखी एक युद्ध टाळण्यासाठी आपल्याला काम पूर्ण करावे लागेल असे ते म्हणाले.
