वृत्तसंस्था, एव्हियां-ले-बॅन्स (फ्रान्स) : इराण युद्ध संपल्यानंतर युक्रेनमधील युद्ध संपविण्याकडे जगातील साऱ्या प्रमुख नेत्यांचे लक्ष गेले असून, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिरी झेलेन्स्की यांनी युरोप आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अधिक सहकार्याची मागणी केली आहे. या वेळी ‘रशियाने युक्रेनबरोबर शांतता करार करायला हवा. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेल्येन्स्की आणि जी-७ देशांच्या नेत्यांमध्ये झालेल्या उत्तम बैठकीनंतर हे युद्ध संपण्यासाठी जे काही आवश्यक आहे, ते मी करायला तयार आहे,’ असे प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.

जी-७ देशांच्या परिषदेसाठी ट्रम्प यांचे सोमवारी फ्रान्समध्ये आगमन झाले. जी-७ देशांचे अध्यक्ष आणि झेलेन्स्की यांच्यात मंगळवारी बंद दारांआड चर्चा झाली. ‘दोन्ही बाजूंना अनेक तरुण धारातीर्थी पडत आहेत. मला जे करणे शक्य आहे, ते सारे करीन. रशियाने करार करायला हवा. मी आठ युद्धे थांबविली. हे युद्ध थांबविण्यासाठी सर्वांत सोपे आहे, असे मला वाटले होते,’ असे ट्रम्प म्हणाले. झेल्येन्स्की यांच्याबरोबर बैठक सकारात्मक झाल्याचे युरोपीय नेत्यांनी सांगितले. ‘हवाई सुरक्षा अधिक बळकट करण्यासह युद्ध संपण्यासाठी राजनैतिक पातळीवर गती देणे आवश्यक आहे, असे झेलेन्स्की म्हणाले. ‘युक्रेन-रशिया युद्धात पारडे युक्रेनच्या बाजूने अधिक आहे. गेल्या वर्षीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती खूप वेगळी आहे. युक्रेनने आघाडी चांगली सांभाळून ठेवली आहे,’ अशी टिप्पणी युरोपीय कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला व्हॉन दर लियेन यांनी ‘एक्स’वर केली.

इराणबाबत भीती व्यक्त

इराणचा अणुकार्यक्रम रोखण्यात अमेरिकेला कितपत यश येईल, अशी भीती युरोपीय नेत्यांना वाटत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. इराणचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम पुढी टप्प्यात पोहोचला, तर दीर्घ काळापर्यंत संघर्ष होऊ शकतो, अशी भीती युरोपीय नेत्यांनी व्यक्त केली. होर्मुझ सामुद्रधुनीला पर्यायी मार्गाचीही चाचपणी झाली. ‘इराणबरोबर करार सुस्पष्ट असून, तो अण्वस्त्रे बनवणार नाही. यापूर्वी इराणने हे कधीच मान्य केले नाही,’ असे ट्रम्प म्हणाले.

इराणवर चर्चा
जी-७ देशांच्या परिषदेत इराणवर चर्चा झाली. इराणविरोधात युद्ध पुकारताना आम्हाला विश्वासात न घेतल्याबद्दल युरोपीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. पश्चिम आशियामध्ये स्थिरता प्रस्थापित करण्यासंदर्भातही सत्र होणार असून, ईजिप्त, कतार, यूएई हे देश त्यात सहभागी होणार आहेत.