Donald Trump G7 Meeting : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २ ऑक्टोबर रोजी झालेल्या ‘जी ७’ नेत्यांच्या व्हर्च्युअल बैठकीत सहभागी झाले होते. मात्र बैठकीदरम्यान ‘आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थे’चे प्रमुख फातिह बिरोल यांनी शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये ट्रम्प यांचा कॅमेरा बंद दिसत होता. त्यांच्या व्हिडिओ टाइलवर केवळ त्यांचे नाव दिसत होते, तर इतर नेत्यांचे कॅमेरे सुरू होते. याबद्दल सविस्तर वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे.

हा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. ट्रम्प नेमके कॅमेरासमोर का नव्हते, यावरून अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. काही युजर्सनी तर ते ‘डुलकी घेत असावेत’ असा विनोद केला. मात्र ट्रम्प झोपले होते, याचा कोणताही पुरावा नाही. तसेच संपूर्ण बैठकीदरम्यान त्यांचा कॅमेरा बंद होता की केवळ स्क्रीनशॉट घेतला त्या क्षणी, हेही स्पष्ट झालेले नाही.

ट्रम्प यांच्या कॅमेऱ्याने वेधलं लक्ष

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आणि ‘जी ७’चे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या अध्यक्षतेखाली ही व्हर्च्युअल बैठक झाली. स्क्रीनशॉटमध्ये कॅनडा, जर्मनी, इटली, ब्रिटन, जपान आणि युरोपियन कमिशनचे प्रतिनिधी कॅमेऱ्यावर दिसत होते. ट्रम्प यांच्या व्हिडिओ टाइलमध्ये मात्र काळी स्क्रीन आणि त्यांचे नाव दिसत होते. व्हाइट हाऊसच्या प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या एमिली गुडिन यांनीही ‘एक्स’वरील पोस्टमध्ये ट्रम्प यांच्या कॅमेऱ्याकडे लक्ष वेधले. त्यानंतर सोशल मीडियावर ट्रम्प यांचा कॅमेरा बंद असल्यावरून अनेक मीम्स आणि विनोदी प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.

‘कदाचित डुलकी घेत असतील’ म्हणत युजर्सचे मीम्स

काही सोशल मीडिया युजर्सनी ट्रम्प यांच्या पूर्वीच्या सार्वजनिक कार्यक्रमांमधील कथित ‘झोपण्याच्या’ घटनांचा संदर्भ देत विनोद केला. एका युजरने कॅमेरा बंद ठेवण्यामागे ‘डुलकी’ असू शकते, असा टोमणा मारला. तर आणखी एका युजरने ‘बॅड हेअर डे’ आणि जेवणानंतरची झोप येणे यांचा संदर्भ देत कॅमेरा बंद ठेवण्याचा विनोद केला. काहींनी तर ‘यावेळी कॅमेरा बंद असल्याने त्यांना झोपताना कोणी पाहू शकणार नाही’, अशा आशयाच्या प्रतिक्रिया दिल्या. मात्र या सर्व सोशल मीडिया प्रतिक्रिया आणि विनोद असून, त्यातून ट्रम्प बैठकीदरम्यान झोपले होते, असा निष्कर्ष काढता येत नाही.

जी ७ बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?

ट्रम्प यांच्या कॅमेऱ्याचा मुद्दा हा बैठकीच्या मुख्य चर्चेपासून वेगळा होता. ‘जी ७’ नेत्यांच्या बैठकीत जागतिक ऊर्जा बाजारातील परिस्थिती आणि इंधनाच्या पुरवठ्याबाबत चर्चा करण्यात आली. नेत्यांनी पुढील चार महिन्यांमध्ये एकत्रितपणे तब्बल १०० दशलक्ष बॅरल तेल आणि इंधन साठे बाजारात उपलब्ध करून देण्याबाबत सर्वसंमतीने निर्णय घेण्यात आला आहे. यातील मोठ्या प्रमाणातील डिझेल साठा पहिल्या २० दिवसांत बाजारात आणण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले.

ऊर्जा पुरवठा स्थिर ठेवणे, ग्राहक आणि व्यवसायांना अचानक वाढणाऱ्या किमतींच्या धक्क्यापासून संरक्षण देणे आणि भविष्यातील ऊर्जा व्यवस्थेला अधिक सक्षम करणे, हे या निर्णयामागील उद्दिष्ट असल्याचे नेत्यांनी सांगितले. नंतर ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वरील पोस्टमध्ये युरोपने आपल्या डिझेल साठ्यातील ‘मोठ्या प्रमाणातील’ इंधन बाजारात आणण्यास सहमती दर्शवल्याचे म्हटले.

दरम्यान, व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉटवरून ट्रम्प यांचा कॅमेरा त्या क्षणी बंद होता, एवढेच स्पष्ट होते. कॅमेरा बंद करण्यामागचे कारण काय होते किंवा ट्रम्प बैठकीदरम्यान झोपले होते का, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.