Donald Trump Georgia Meloni US Italy Relations Controversy: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यावर टीका केली आहे. फ्रान्समध्ये नुकत्याच पार पडलेल्या जी७ शिखर परिषदेदरम्यान जागतिक नेते एकत्र आले होते. या परिषदेनंतर ट्रम्प यांनी केलेल्या विधानामुळे मेलोनी संतापल्या होत्या. “मेलोनी माझ्याबरोबर फोटो काढण्यासाठी आतुर झाल्या होत्या, त्या वारंवार फोटो काढण्यासाठी विनंती करत होत्या”, असा दावा ट्रम्प यांनी केला होता. आता त्यांनी आणखी नवीन दावा केला आहे. मेलोनी यांना अमेरिकेशी पुन्हा एकदा जुळवून घ्यायचे आहे, यासाठी त्या प्रयत्नशील असल्याचा दावा ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल मीडिया साईटवर केलेल्या पोस्टमध्ये केला.

फोटो काढण्याच्या दाव्याला मेलोनी यांनी सडेतोड उत्तर दिले होते. ‘मी आणि माझा देश इटली कुणासमोरही भीक मागत नाही’, असे रोखठोक उत्तर मेलोनी यांनी दिल्यानंतर ट्रम्प यांनी हा विषय आणखी पुढे नेला आहे. मेलोनी यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे ट्रम्प यांचा दावा खोडून काढल्यानंतर आता त्यांनी दोन देशांच्या संबंधांवर भाष्य केले आहे.

ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये मेलोनी यांना लक्ष्य केले. अमेरिकेने इराणविरोधात आखलेल्या लष्करी मोहिमेला पाठिंबा देण्यास मेलोनी यांनी नकार दिला होता. त्यांच्या भूमिकेमुळे इटलीमध्ये मेलोनी यांची लोकप्रियता घटत होती. आता अमेरिकेने जेव्हा इराणवर निर्णायक विजय मिळवला आहे, त्यानंतर इटलीला पुन्हा एकदा अमेरिकेशी संबंध सुधारायचे आहेत, असा दावा ट्रम्प यांनी केला.

Giorgia Meloni slams Donald Trump
डोनाल्ड ट्रम्प यांनी इटालियन वृत्तवाहिनी La7 ला दिलेल्या मुलाखतीनंतर हा वाद सुरू झाला.

इराणच्या भूमिकेबद्दल ट्रम्प यांची मेलोनींवर नाराजी

या ताज्या वादामुळे ट्रम्प आणि मेलोनी यांच्यातील द्विपक्षीय संबंधांत पुन्हा एकदा ताण निर्माण झाल्याचे दिसत आहे. चार महिन्यांपूर्वी इराण संघर्ष सुरू झाल्यानंतर मेलोनी यांनी इटलीच्या भूमीचा वापर या संघर्षासाठी होऊ देण्यास विरोध दर्शवला होता. त्यावेळीही ट्रम्प यांनी मेलोनी यांच्यावर टीका केली होती.

ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “त्यांनी (मेलोनी) आम्हाला इटलीमधील लँडिंग स्ट्रिप्स किंवा धावपट्ट्या वापरू दिल्या नाहीत. ही एक मोठी लॉजिस्टिकल गैरसोय होती.” त्याशिवाय इराणवरील मोहिमेला समर्थन देण्यास नकार देणाऱ्या नाटो मित्र राष्ट्रांवरही ट्रम्प यांनी टीका केली.

donald trump on meloni iran war
डोनाल्ड ट्रम्प यांची ट्रुथ वरील पोस्ट

इराण युद्ध जिंकल्यामुळे मैत्री करायची आहे

ट्रम्प यांनी पुढे म्हटले की, इराणविरोधातील लष्करी कारवाईत अमेरिकेला यश मिळाल्यामुळे मेलोनी अमेरिकेबरोबर संबंध सुधारण्याचे प्रयत्न करत आहेत. यातून त्या पुन्हा एकदा त्यांच्या मित्र राष्ट्रांचे संख्याबळ वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आम्हाला त्यांची मैत्री आता नको आहे.

२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात लष्करी कारवाई सुरू केली होती. नुकताच या दोन राष्ट्रांत सामंजस्य करार झाला असून त्यावर स्वाक्षरी झाली आहे. त्यानंतर ट्रम्प यांनी हा दावा केला असून यामुळे अमेरिका आणि युरोपीय मित्र राष्ट्रांमधील मतभेद उघड झाले आहेत.