Donald Trump Giorgia Meloni: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यात जी-७ परिषदेपासून सुरु झालेले शीतयुद्ध काही संपण्याचे नाव घेत नाही. मेलोनी फोटोसाठी विनंती करत होत्या, असा दावा केल्यानंतर ट्रम्प यांना जोरदार प्रत्युत्तर देणाऱ्या इटलीच्या पंतप्रधानांना ट्रम्प यांनी पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन एक विचित्र मीम शेअर केले आहे. या फोटोत मेलोनी ट्रम्प यांच्याकडे हसतमुखाने पाहत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या फोटोला ट्रम्प यांनी उपरोधिक कॅप्शनही दिलं आहे.
ट्रम्प यांच्याकडून मेलोनीबरोबर फोटो शेअर
डोनाल्ड ट्रम्प आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात जी-७ परिषदेपासून शाब्दिक वाद सुरु झाला आहे. मेलोनी फोटोसाठी भीक मागत होत्या, असा दावा ट्रम्प यांनी केला होता. यावर मेलोनी यांनी, “मी आणि इटली कधीच भीक मागत नाही”, असे जोरदार प्रत्युतर दिले होते. यानंतर आता ट्रम्प यांनी मेलोनी यांच्याबरोबरचा एक एडिट केलेला फोटो ट्रुथ सोशलवर पोस्ट केला आहे. यावर ट्रम्प यांनी ” रिस्ट्रेंनिंग ऑर्डर काढण्याची गरज आहे,” अशी उपरोधिक कॅप्शनही लिहिली आहे.
ट्रम्प यांची वादग्रस्त पोस्ट
ट्रम्प यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये ४९ वर्षीय जॉर्जिया मेलोनी या ट्रम्प यांच्याकडे हसतमुखाने पाहत असल्यासारख्या दिसत आहेत. या फोटोच्या माध्यमातून मेलोनी यांना ट्रम्प यांच्याबद्दल विशेष आकर्षण असल्याचे भासवण्यात आले आहे. ट्रम्प यांनी याला दिलेल्या कॅप्शनमुळे त्याला अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ट्रम्प यांनी रविवारी ट्रुथ सोशलवर काही वादग्रस्त पोस्ट्स केल्या होत्या. यामध्ये त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांचाही एक फोटो शेअर केला होता.
आगामी नाटोची बैठक
जी-७ परिषदेनंतर ट्रम्प आणि मेलोनी पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. तुर्की येथे होणाऱ्या आगामी नाटोच्या परिषदेत ट्रम्प आणि मेलोनी यांच्यासह जगातील इतर प्रमुख नेते एकत्र येणार आहेत. नाटो परिषदेच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांची ही पोस्ट समोर आली आहे. दरम्यान, यापूर्वी झालेल्या वादानंतर आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा नवा वाद ओढावून घेतला आहे.
