Donald Trump Iran Threat Hormuz Strait Deadline: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा मोठा इशारा दिला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी दिलेली मुदत पाळली नाही तर इराणवर भयंकर संकट कोसळेल, असे ट्रम्प म्हणाले आहेत. होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यासाठी ट्रम्प यांनी ६ एप्रिलची मुदत दिली होती. ही मुदत जवळ येत असून आता वेळ निघून जात आहे, अशी आठवण त्यांनी करून दिली आहे.
ट्र्थु सोशल मीडियावर ट्रम्प यांनी काही वेळेपूर्वी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी इराणवर मोठा हल्ला होणार असल्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे, शुक्रवारी इराणने अमेरिकेची दोन लढाऊ विमाने पाडली असल्याचा दावा केला. विमानातील काही कर्मचाऱ्यांना कैद केल्याचे इराणी लष्कराने म्हटले. तसेच या कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी आलेल्या अमेरिकन लष्कराच्या ब्लॅक हॉक या हेलिकॉप्टरवरही इराणने हल्ला केला.
ट्रम्प यांनी पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “तुम्हाला आठवत असेल तर मी इराणला सांगितले होते की, करार करा किंवा होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा. यासाठी त्यांना दहा दिवसांची मुदत दिली होती. ही वेळ आता संपत आली आहे. पुढच्या ४८ तासांत त्यांच्यावर आता नरकासमान आपत्ती कोसळेल. देवाचा विजय असो! राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प.”
यापूर्वी ट्रम्प यांनी इराणबरोबर सुरू असलेल्या चर्चेबद्दल आशावाद व्यक्त केला होता. होर्मुझच्या सामुद्रधुनीचा जलमार्ग खुला करण्यासाठीची अंतिम मुदत १० दिवसांनी वाढवून त्यांनी ६ एप्रिल केली होती.
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर त्यांनी होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग रोखला. या मार्गातून जागतिक ऊर्जा पुरवठ्यापैकी सुमारे २० टक्के वाहतूक होत असते. हा मार्ग बंद झाल्यामुळे जागतिक ऊर्जा टंचाई निर्माण झाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा यु-टर्न?
ट्रम्प वारंवार आपली विधाने बदलत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी होर्मुझ बंद राहिली तरी चालेल, पण युद्ध थांबवा, असे विधान केले होते. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले आहे की, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहिली तरीही ते इराणविरुद्धची लष्करी मोहीम थांबवण्यास तयार आहेत.
या अहवालानुसार, ट्रम्प हे आधी युद्ध संपवण्याचा आणि सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याचा विचार नंतर करण्याचा विचार करत आहेत. यासाठी दुसरा पर्याय म्हणजे, हा सागरी मार्ग पुन्हा खुला करण्यासाठी आखाती देश आणि नाटो (NATO) सह मित्रराष्ट्रांना पुढाकार घेण्यास विनंती करणार आहेत.
