पीटीआय, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन
‘अमेरिका भारताबरोबर व्यापार करार करण्याच्या अगदी समीप आहे. भारताच्या वस्तूंवर लावण्यात आलेला कर नंतर कमी केला जाईल,’ असे प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. ट्रम्प यांनी दोन आठवड्यांत दुसऱ्यांदा भारताबरोबर करार लवकरच करण्यासंदर्भात विधान केले आहे.
अमेरिकेचे राजनैतिक अधिकारी सर्जिओ गोर यांची भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करताना झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ट्रम्प म्हणाले, ‘आम्ही भारताबरोबर करार करीत आहोत. अमेरिकेबरोबर यापूर्वी जो करार होता, त्यापेक्षा हा करार खूप वेगळा असेल. सध्या त्यांना (भारताला) मी आवडत नाही. पण, नंतर पुन्हा आवडू लागेन. आम्ही अतिशय योग्य असा करार करीत आहोत. यापूर्वी अनेक अयोग्य करार होते. ते (भारत) अतिशय चांगले सल्लामसलत करतात. सर्जिओ यांनी याकडे लक्ष द्यायला हवे. पण, आम्ही खरेच करार करण्याच्या खूप जवळ आलो आहोत. सर्वांसाठीच हे चांगले आहे. यापूर्वीचे अध्यक्ष जो बायडेन यांना भारताविषयी काहीही माहीत नव्हते.’
ट्रम्प म्हणाले, ‘भारताच्या वस्तूंवर सध्या जास्त कर आहे. भारत रशियाकडून तेलखरेदी करीत असल्यामुळे हा कर आहे. ही खरेदी भारत थांबवीत आहे. आम्ही भारतावरील कर नक्कीच कमी करू.’
