Donald Trump Iran Oil Kharg Island News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही काळापूर्वी व्हेनेझुएलावर लष्करी कारवाई करत तेथील तेलसाठ्यांचा ताबा घेतला. त्यानंतर आता त्यांनी इराणबाबतही त्यांचा हेतू बोलून दाखवला आहे. इराणच्या तेलाशी निगडित सुविधांवर नियंत्रण मिळवायचे असल्याचा मनसुबा ट्रम्प यांनी व्यक्त केला. इराणनजीक असलेले खर्ग बेट हे तेल निर्यातीच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचे मानले जाते. हे बेट आपण सहज ताब्यात घेऊ, असे ट्रम्प म्हणाले आहेत.

फायनान्शिअल टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ट्रम्प यांनी इराण युद्धाची पुढची संभाव्य रणनीती काय असू शकेल, यावर भाष्य केले. ते म्हणाले, खरं सांगायचे तर इराणच्या तेलावर नियंत्रण मिळवणे, हे माझे सर्वात आवडते काम आहे. या बेटावर इराणची सुरक्षा व्यवस्था कमकुवत आहे. आम्ही अगदी सहजरित्या ते ताब्यात घेऊ शकतो.

इराणविरोधात अमेरिका आणि इस्रायल आक्रमक पवित्रा घेत असून अमेरिका मध्यपूर्वेत हजारो सैनिक तैनात करण्याच्या तयारीत आहे. ट्रम्प याबाबत म्हणाले, “खर्ग बेटावरील इराणचे प्रमुख तेल निर्यात केंद्र अमेरिका ताब्यात घेऊ शकते. पण अमेरिकेतील काही मूर्ख लोक याला विरोध करत असून यावर ते प्रश्न उपस्थित करत आहेत.”

‘फायनान्शिअल टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प पुढे म्हणाले, “पेंटागॉन अनेक लष्करी पर्यायांचा विचार करत आहे. आम्ही कदाचित खर्ग बेट ताब्यात घेऊही किंवा कदाचित घेणारही नाही. आमच्याकडे बरेच पर्याय आहेत. तसेच आम्ही त्याठिकाणी (खर्ग बेटावर) अधिक काळ राहू.”

इराण संघर्षात १० हजार सैनिक तैनात करण्याचे आदेश

मध्य-पूर्वेतील इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षादरम्यान अमेरिकेने १० हजार सैनिक तैनातीचे आदेश दिले आहेत. यामध्ये २,५०० मरीन सैनिकांसह एकूण ३,५०० सैनिक शुक्रवारी मध्यपूर्वेत दाखल झाले. तर आणखी २,२०० मरीन सैनिक येणार आहेत. ८२ व्या एअरबोर्न डिव्हिजनमधील आणखी हजारो जवानांनाही तैनात करण्याचे आदेश पेंटागॉनने दिले आहेत.

जीवितहानीचा धोका

अमेरिकेने जमिनीवरून हल्ल्याची तयारी केली असली तरी त्यांचा हा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो, असा इशारा लष्करी विश्लेषकांनी दिला आहे. यामुळे अमेरिकेच्या जीवितहानीची शक्यता वाढेल आणि मध्य पूर्वेतील संघर्ष लांबू शकतो. तसेच जगातील सर्वात महत्त्वाच्या तेलवाहिन्यांपैकी एक असलेल्या जलमार्गाला धोका निर्माण होऊ शकतो.

Iran Kharg Island
इराणच्या धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘खर्ग बेटावर’ ट्रम्प यांचा डोळा आहे.

इराणसाठी खर्ग बेटाचे महत्त्व काय?

इराणच्या किनाऱ्यापासून १६ मैल (२६ किमी) अंतरावर खर्ग बेट स्थित असून तेल निर्यातीचे ते एक्सपोर्ट टर्मिनल म्हणून ओळखले जाते. इराणची ९० टक्के तेलवाहू जहाज इथूनच जातात. लक्षद्वीपच्या एकत्रित बेटापेक्षा लहान असलेले हे बेट इराणच्या तेल उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाचे ठिकाण आहे.

इराणसाठी खर्ग बेट धोरणात्मकदृष्ट्या अतिमहत्त्वाचे आहे. अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएने १९८४ सालच्या एका गुप्त अहवालात खर्ग बेट इराणच्या पेट्रोलियम व्यवस्थेचा कणा असल्याचे म्हटले होते. इराणची अर्थव्यवस्था आणि इराकविरोधातील युद्ध मोहिमेसाठी हे अनन्यसाधारण बेट असल्याचे अमेरिकेचे निरीक्षण आहे.