Donald Trump remark over Tariff on India : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी (२ जुलै) भारत व अमेरिकेत मोठा व्यापार करार (ट्रेड डील) होणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “दोन्ही देशांमध्ये एक व्यापार करार होतोय. यामध्ये खूप कमी टॅरिफ (आयात शुल्क) असेल. या करारामुळे दोन्ही देशांना जागतिक स्तरावर चांगली कामगिरी व स्पर्धा करण्याची संधी मिळेल.”
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “मला वाटतंय की आपला भारताबरोबर एक करार होणार आहे. हा खूप वेगळ्या प्रकारचा करार असेल. ज्याद्वारे आपल्याला तिथे (भारता) जाऊन स्पर्धा करता येईल. सध्या भारत कोणालाही आपल्या देशात शिरू (बाजारपेठेच्या बाबतीत) देत नाही. परंतु, मला आता असं वाटतंय की भारत आता असे करेल. जर भारताने आपल्याला तिथे स्पर्धा करण्याची संधी दिली तर खूपच कमी टॅरिफवर भारत व अमेरिकेचा व्यापार करार पूर्ण होईल.”
९ जुलैआधी व्यापार करार पूर्ण होण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून भारत व अमेरिकेमध्ये द्विपक्षीय व्यापार करारावर (Bilateral Trade Agreement – BTA) चर्चा चालू आहे. ९ जुलैआधी ही चर्चा पूर्ण होऊन दोन्ही देशांचा करार होणं आवश्यक आहे. कारण ट्रम्प यांनी विविध देशांवर भरमसाठ आयात शुल्क लावलं होतं. हा निर्णय ९० दिवसांसाठी स्थगित करण्यात (Tariff escalation pause) आला होता. ९ जुलै रोजी ९० दिवस पूर्ण होतील आणि अमेरिका नवे आयात शुल्क लागू करेल. तत्पूर्वी भारत व अमेरिकेला द्विपक्षीय व्यापार करार पूर्ण करायचा आहे.
अमेरिकेबरोबर होणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या व्यापार कराराकडे सर्वांचं लक्ष आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिल रोजी भारतासह जगभरातील अनेक देशांवर टॅरिफ (आयात शुल्क) लागू करण्याची घोषणा केली होती. अमेरिकेने भारतावर २६ टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली होती. मात्र, हे टॅरिफ ९० दिवसांसाठी स्थगित करण्यात आलं होतं. अमेरिका सध्या भारताकडून केवळ १० टक्के आयात शुल्क आकारत असून ९ जुलै रोजी उभय देशांमध्ये नवा व्यापार करार झाला नाही तर अमेरिका भारताकडून २६ टक्के आयात शुल्क आकारेल. दरम्यान, नव्या करारामुळे दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध आणखी दृढ होतील अशी आशा ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे.