I like her, but she made mistake Trump on Meloni: इराण संघर्षाच्या काळात अमेरिकेला साथ न दिल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यावर निशाणा साधला आहे. “मेलोनी यांनी अमेरिकेला मदत नाकारून मोठी चूक केली असून, यामुळे आमच्या संबंधांमध्ये कटुता आली आहे,” असा दावा ट्रम्प यांनी केला. तुर्कीची राजधानी अंकारा येथे सुरू असलेल्या ‘नाटो’ परिषदेदरम्यान ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही देशांमधील धोरणात्मक मतभेद आता जागतिक स्तरावर चव्हाट्यावर आले आहेत.

ट्रम्प नेमकं काय म्हणाले? मेलोनींनी कोणती ‘चूक’ केली?

अंकारा येथील नाटो परिषदेदरम्यान पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी मेलोनी यांच्यावर टीका केली, सोबतच त्यांचे कौतुकही करण्याचा प्रयत्न केला.

“जॉर्जिया मेलोनी या एक चांगल्या व्यक्ती आहेत, पण इराण संघर्षात त्यांनी घेतलेली भूमिका चुकीची होती. इटलीने मध्य-पूर्वेतील अमेरिकेच्या मोहिमेला पाठिंबा देण्यास नकार दिला. त्यांनी आम्हाला मदत केली नाही, त्यामुळेच आमच्या संबंधांमध्ये थोडा दुरावा आला आहे. मला त्या आवडतात, पण यावेळी त्यांनी नक्कीच मोठी चूक केली आहे.” – डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका

दोन्ही नेत्यांमधील हा वाद गेल्या काही आठवड्यांपासून सुरु आहे. एकेकाळी ट्रम्प यांचे युरोपमधील सर्वात खंदे समर्थक म्हणून मेलोनी यांच्याकडे पाहिले जायचे. परंतु, इराण युध्दाचं संकट, नाटो देशांचं संरक्षण बजेट आणि सोशल मीडियावरील शाब्दिक चकमक यांमुळे या दोन बड्या नेत्यांमधील मैत्रीत आता मोठी दरी निर्माण झाली आहे.

‘तेव्हा’ जवळ आले, ‘आता’ का दुरावले? दोन्ही नेत्यांमधील वादाची ४ मुख्य कारणे

१. व्हॅटिकन सिटी आणि पोप यांच्यावरून वाद: या वादाची ठिणगी तेव्हा पडली, जेव्हा ट्रम्प यांनी इराण युद्धाचा निषेध करणाऱ्या पोप लिओ यांच्यावर टीका केली होती. मेलोनी यांनी उघडपणे पोप यांच्या भूमिकेचे समर्थन केले, जे ट्रम्प यांना रुचले नाही.

२. ‘हॉर्मुजची सामुद्रधुनी’ मार्ग: इराणसोबतच्या तणावादरम्यान जागतिक तेल पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हॉर्मुज सामुद्रधुनीचा जलमार्ग पुन्हा खुला करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना इटलीने मदत नाकारली, असा आरोप ट्रम्प यांनी केला होता.

३. अमेरिकन लढाऊ विमानांना परवानगी नाकारली: गेल्या मार्च महिन्यात इटलीने सिसिली येथील आपल्या ‘सिगोनेला एअरबेस’वर अमेरिकन लष्करी विमानांना उतरण्यास बंदी घातली होती. मध्य-पूर्वेकडे जाणाऱ्या या विमानांसाठी अमेरिकेने इटलीची अधिकृत परवानगी घेतली नव्हती, असे सांगत मेलोनी सरकारने ट्रम्प यांना मोठा झटका दिला होता.

४. शपथविधीची ती जवळीक संपली: विशेष म्हणजे, २०२५ मध्ये ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या जॉर्जिया मेलोनी या एकमेव युरोपीय नेत्या होत्या. दोघांचेही विचार स्थलांतरित आणि देशाच्या सार्वभौमत्वाबाबत सारखे असल्याने ही जोडी जगात चर्चिली गेली होती. मात्र, आता ती जवळीक संपल्याचे चित्र आहे.

सोशल मीडियावरील ‘मॉर्फ’ केलेला फोटो आणि ‘भीक’ मागण्याचा आरोप

हा वाद केवळ धोरणात्मक राहिला नसून आता वैयक्तिक पातळीवर पोहोचला आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया अकाउंटवर मेलोनी यांचा एक मॉर्फ (बदललेला) फोटो शेअर केला होता, ज्यावर ‘रेस्ट्रेनिंग ऑर्डर आवश्यक’ असे लिहिले होते. तसेच, फ्रान्समधील जी-७ (G7) परिषदेदरम्यान मेलोनी यांनी आपल्यासोबत फोटो काढण्यासाठी ‘भीक’ मागितली होती, असा दावा ट्रम्प यांनी इटालियन टीव्ही चॅनेल ‘La7’शी बोलताना केला होता.

यावर पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी ट्रम्प यांना अत्यंत कडक शब्दांत सुनावले आहे. मेलोनी म्हणाल्या, “इटली आणि मी कधीही कोणाकडे भीक मागत नाही. ट्रम्प हे खोट्या गोष्टी रचत आहेत. माझ्यावर होणारे हे विनाकारण वैयक्तिक हल्ले अर्थहीन आहेत. ट्रम्प, तुमची मैत्री माझ्या लोकप्रियतेसाठी अजिबात फायद्याची ठरलेली नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या लोकप्रियतेवर लक्ष केंद्रित केलेले बरे!”

इटलीकडून वाद मिटवण्याचा प्रयत्न; ‘नाटो’ परिषदेत काय होणार?

दोन्ही देशांमध्ये राजनैतिक संकट निर्माण होऊ नये म्हणून इटलीच्या गृहमंत्रालयाने आणि संरक्षणमंत्र्यांनी सावध भूमिका घेतली आहे. इटलीचे परराष्ट्र मंत्री अँटोनियो ताजानी म्हणाले, “ट्रम्प यांना सोशल मीडियावर चिथावणीखोर वक्तव्ये करायची सवय आहे. आम्ही त्यांच्या प्रत्येक विधानाला उत्तर देणार नाही.” तर संरक्षण मंत्री ग्विडो क्रोसेट्टो यांनी, “नेते येतात आणि जातात, पण अमेरिकेसारख्या महत्त्वाच्या मित्रदेशासोबतचे संबंध टिकून राहणे गरजेचे आहे,” असे म्हणत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला.

अंकारा येथील नाटो परिषदेत आता हे दोन्ही नेते आमनेसामने आले आहेत. मेलोनी यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मेलोनी या वादाचा कोणताही दबाव न घेता ट्रम्प यांना नेहमीप्रमाणे ‘हसून’ सामोरे जातील. मात्र, पडद्यामागे युरोपने अमेरिकेच्या आक्रमक लष्करी धोरणांना किती साथ द्यायची, यावरून सुरू असलेला हा संघर्ष जागतिक राजकारणाला कोणती कलाटणी देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.