अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान होताच डोनाल्ड ट्रम्प यांनी अनिवासी नागरिकांसंदर्भात दिलेल्या कठोर आदेशामुळे तेथे वास्तव्यास असलेले भारतीय वंशाचे तीन लाख नागरीक अडचणीत येतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अनिवासी नागरिकांबाबत ट्रम्प प्रशासन आणखी कठोर बंदी घालण्याची तयारी करत आहे. ट्रम्प यांच्या नवीन निर्देशांमुळे वैध दस्तावेज नसलेल्या अमेरिकेतील जवळपास १.१ कोटी नागरिकांवर हकालपट्टीची टांगती तलवार आहे, असे बोलले जात आहे.

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैधरीत्या अमेरिकेत वास्तव्य करत असलेल्या लाखो अनिवासी नागरिकांची हकालपट्टी करण्यासाठी नवीन दिशानिर्देश जारी केले आहेत. या निर्देशांमुळे अमेरिकेत वास्तव्य करत असलेल्या अनिवासी नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. अमेरिकेतील डिपार्टमेंट ऑफ होमलॅण्ड सिक्युरिटीने जारी केलेल्या एका मेमोनुसार, अनिवासी नागरिकांची हकालपट्टी करण्याच्या प्रक्रियेत पूर्वीसारखे काही वर्ग आणि श्रेणींतील नागरिकांना सूट देण्यात येणार नाही, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. विभागाच्या अधिकाऱ्यांना अवैधरीत्या वास्तव्य करत असलेल्या अनिवासी नागरिकांना अटक करण्यासंबंधी किंवा ताब्यात घेण्यासंबंधीचे संपूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. इमिग्रेशन कायद्याचे उल्लंघन केल्याचा ज्या नागरिकांवर संशय आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना आहे, असेही त्यात स्पष्टपणे नमूद केले आहे.

दरम्यान, या मेमोत अवैधरित्या वास्तव्य करत असलेल्या अनिवासी नागरिकांवर कारवाई करण्याचे स्पष्टपणे म्हटले असले तरी, इतरही अनिवासी नागरिकांवर कारवाई करण्याचा अथवा त्यांच्या चौकशीचा मार्ग खुला झाला आहे, असे संकेत देण्यात आले आहेत. अंदाजित आकडेवारीनुसार, अमेरिकेत जवळपास ३ लाख भारतीय अनिवासी वास्तव्यास असून, त्यांच्याकडे वैध दस्तावेज नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्यावरही ट्रम्प सरकारच्या आदेशामुळे कारवाईची टांगती तलवार असणार आहे.