अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमात जन्माधारित नागरिकत्वावर आधारलेले एक पत्र प्रसिद्ध केले. त्यात भारत आणि चीनचा उल्लेख पृथ्वीवरील नरकयातना देणारी ठिकाणे म्हणून केला होता. या वक्तव्यावर टीका होऊ लागल्यानंतर अमेरिकेने माघार घेतली. मात्र ट्रम्प यांनी हे विधान अज्ञानातून केले असून, ते अयोग्य असल्याचे भारताने म्हटले आहे. कॅलिफोर्नियामधील तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमधील भरती प्रक्रियेवर पत्रात प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
‘भारत आणि चीनमधील नागरिक अमेरिकी नोकऱ्या हिरावून घेतात. अमेरिकेतील जन्माधारित नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित करून येथे जन्माला आलेल्या मुलांना लगेच अमेरिकी नागरिकत्व मिळते. नंतर भारत, चीन किंवा पृथ्वीवरील इतर नरकयातना देणाऱ्या ठिकाणांहून (हेलहोल ऑन द प्लॅनेट) संबंधित कुटुंबे देशात दाखल होतात,’ अशी वादग्रस्त टिप्पणी पत्रात केली आहे. यावर जोरदार टीका होऊ लागल्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी परिस्थिती सावरून घेतली. ‘भारत हा एक महान देश असून, त्याचे नेतृत्व माझे मित्र करीत आहेत,’ असे अमेरिकेच्या अध्यक्षांना वाटते, असे म्हटले आहे.
आम्ही ‘त्या’ टिप्पणी आणि त्यानंतर अमेरिकन दूतावासाने दिलेले स्पष्टीकरण पाहिले. पत्रातील विधाने स्पष्टपणे अपुऱ्या माहितीवर आधारित, अनुचित आणि अभिरुचीशून्य आहेत. ती भारत-अमेरिका संबंधांच्या वास्तवाचे प्रतिबिंब नक्कीच नाहीत, जे दीर्घकाळापासून परस्पर आदर आणि सामायिक हितांवर आधारित आहेत. – रणधीर जैस्वाल, प्रवक्ते, परराष्ट्र मंत्रालय
इराणचा भारताला पाठिंबा
ट्रम्प यांनी प्रसारित केलेल्या पत्रावर इराणने भारत आणि चीनला पाठिंबा दर्शवला आहे. दोन्ही देशांची संस्कृती महान असल्याचे इराणने म्हटले आहे. हैदराबादमधील इराणच्या महावाणिज्यदूतावासाने ‘एक्स’वर केलेल्या टिप्पणीत म्हटले की, ‘खऱ्या नरकयातना देणारा भाग तो असतो, जिथे युद्धगुन्हेगार अध्यक्ष इराणची पूर्ण संस्कृती नष्ट करण्याची धमकी देतो.’
