Donald Trump On Indian Tariffs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की भारताने अमेरिकन वस्तूंवरील सर्व व्यापार शुल्क रद्द करण्याचा प्रस्ताव दिला आहे, परंतु या प्रकरणात स्पष्ट यश मिळूनही व्यापार करार औपचारिक करण्याची त्यांना घाई नाही, असेही ते म्हणाले.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दाव्यावर प्रतिक्रिया देताना, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गुरुवारी सांगितले होते की चालू वाटाघाटी गुंतागुंतीच्या आहेत आणि याला अंतिम स्वरूप येण्यास अजून वेळ आहे.

शुक्रवारी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, भारत हा अशा देशाचे एक उत्तम उदाहरण आहे जिथे व्यापार करण्यास खूप अडथळे आहेत जे ते दूर करण्यास आम्ही कटिबद्ध आहेत.

“तेथे व्यापार करणे जवळजवळ अशक्य आहे. तुम्हाला माहिती आहे का ते अमेरिकेसाठी त्यांच्या १००% व्यापार शुल्कात कपात करण्यास तयार आहेत?”, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

परंतु ट्रम्प यांनी भारताबरोबरचा करार किधीपर्यंत होईल याबद्दल मिश्र संकेत देखील दिले, ते म्हणाले, “तो करार लवकरच होईल. मला घाई नाही. हे पहा, प्रत्येकजण आपल्याशी करार करू इच्छित आहे.”

भारत आणि पाकिस्तानसोबतच्या अमेरिकेच्या व्यापार करारावर बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, त्यांनी भारताचा प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबतच्या विस्तारित व्यापाराच्या शक्यतेलाही आव्हान दिले आहे. भारतातील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या सीमा वादांमध्ये शस्त्रविरामात करारात मध्यस्थी करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नात हा एक भाग असल्याचे ट्रम्प यांनी यापूर्वी म्हटले होते.

दरम्यान गेल्या दोन-तीन महिन्यांपासून चीनसोबत सुरू असलेला व्यापार संघर्ष अमेरिकेने कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. अलिकडच्या चर्चेनंतर, अमेरिकेने चीनवरील आपले व्यापार शुल्क१४५% वरून ३०% पर्यंत कमी केले आहे. तर, चीनने अमेरिकेवरील व्यापार शुल्क शुल्क १२५% वरून १०% पर्यंत कमी केले आहे.

ट्रम्प यांचे पुन्हा ‘टॅरिफ’अस्त्र

शुक्रवारी संयुक्त अरब अमिरातीतील त्यांच्या दौऱ्यादरम्यान उद्योगपतींशी झालेल्या बैठकीत बोलताना ट्रम्प म्हणाले, “आमच्याशी एकाच वेळी १५० देश करार करू इच्छित आहेत, परंतु आम्ही इतक्या देशांकडे लक्ष देऊ शकत नाही. आमच्याशी भेटू इच्छिणाऱ्या सर्वांशी चर्चा करणे शक्य नाही”, असे वृत्त द गार्डियनने दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितेल की, कोषागार सचिव स्कॉट बेसेंट आणि वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांच्याकडे काही देशांना पत्राद्वारे नवीन व्यापार शुल्काची माहिती देण्याचे काम सोपवले जाईल. “पुढील दोन किंवा तीन आठवड्यांत एका विशिष्ट टप्प्यावर, मला वाटते की स्कॉट आणि हॉवर्ड संबंधित देशांना पत्रे पाठवून, अमेरिकेत व्यवसाय करण्यासाठी किती पैसे द्यावे लागतल याची माहिती देतील.”