Donald Trump India Hellhole Comment MEA Official Reaction: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भारत आणि चीनचा उल्लेख ‘नरक’ (हेलहोल) असा करण्यात आलेली पोस्ट सध्या वादात सापडली आहे. या पोस्टवर भारत काय प्रतिक्रिया देणार याकडे लक्ष लागलेले असतानाच परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणात थेट भाष्य करणे टाळले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी फक्त “आम्ही काही रिपोर्ट पाहिले आहेत,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
ट्रम्प यांच्या विधानाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना जयस्वाल म्हणाले की, “आम्ही काही अहवाल पाहिले आहेत. यापेक्षा जास्त मी काही बोलणार नाही.”
नेमकं काय झालं?
ट्रम्प यांनी बुधवारी (स्थानिक वेळेनुसार) त्यांच्या ट्रुथ सोशलवर मायकल सॅव्हेज यांच्या ‘टॉक शो’च्या व्हिडीओची ट्रान्सस्क्रिप्ट पोस्ट केली. यानंतर भारताकडून ही प्रतिक्रिया समोर आली आहे. या शोमध्ये सॅव्हेज हे अमेरिकेतील जन्मजात नागरिकत्वाच्या हक्कावर बोलत होते. ज्यामध्ये असा दावा केला की, काही लोक गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात अमेरिकेत येतात जेणेकरून त्यांच्या मुलाला आपोआप तिथले नागरिकत्व मिळेल. पुढे ते असेही म्हणाले की, असे लोक नंतर भारत आणि चीनसारख्या देशांतील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अमेरिकेत आणतात, ज्या देशांचा उल्लेख त्यांनी पृथ्वीवरील नरक (हेलहोल) असा केला.
तसेच त्यांनी युक्तीवाद केला की एमिग्रेशन ट्रेंड्स हे अमेरिकन समाजाची रचना बदलत आहेत. याबरोबरच त्यांनी अमेरिकेचे संविधान कालबाह्य झाल्याची टीका देखील केली. अमेरिकेचे संविधान विमान प्रवास आणि इंटरनेटसारख्या अधुनिक गोष्टींसाठी सुसंगत नसल्याचे ते म्हणाले.
मायकल सॅव्हेजचा व्हिडीओ काय?
समोर आलेल्या व्हिडीओनुसार, “इथे जन्मल्यानंतर मुलाला लगेच नागरिकत्व मिळते आणि नंतर ते चीन, भारत किंवा जगातील इतर कोणत्याही नरक (हेलहोल) जागेतून आपल्या संपूर्ण कुटुंबाला अमेरिकेत घेऊन येतात,” मायकल सॅव्हेज या व्हिडीओत बोलताना दिसत आहे. ट्रम्प यांनी हा व्हिडीओ शेअर करून एकप्रकारे या विचारांचे समर्थन केले आहे.
“तुम्हाला हे अनुभवण्यासाठी दूर जाण्याची गरज नाही. इथं इंग्रजी आता बोललं जात नाही. ते (स्थलांतरीत) या देशाप्रती इमानदार नाहीत”, असे सॅव्हेज पुढे म्हणतो.
याच व्हिडीओत पुढे अमेरिकेतील विशेषतः कॅलिफोर्नियातील तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरभरतीवर भारतीय आणि चिनी लोकांचे वर्चस्व आहे, असा दावा करण्यात आला आहे. “गोऱ्या लोकांना नोकरीसाठी अर्ज करण्याची गरज नाही, कारण सर्व अंतर्गत यंत्रणा भारतीय आणि चिनी लोकांकडून चालवल्या जातात”, असे या व्हिडीओत म्हटले आहे. भारतीयांचा मी समर्थक होतो पण इथं जे सुरु आहे ते पाहून माझे डोळे उघडले असे सॅव्हेज या व्हिडीओत म्हणत आहे.
काँग्रेसची जोरदार टीका
“अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारताला नरक म्हटले आहे. ही गोष्ट अत्यंत अपमानास्पद आणि भारतविरोधी आहे. प्रत्येक भारतीयाला यामुळे वेदना झाल्या आहेत. यासाठी पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी बोलले पाहिजे आणि तीव्र आक्षेप नोंदवला पाहिजे. पण, ज्याप्रकारचे मोदींचे ट्रॅक रेकॉर्ड राहिले आहे, अशी अपेक्षा केली जाऊ शकत नाही की ट्रम्प यांच्या पुढे ते काही बोलू शकतील. ट्रम्प वारंवार भारताबद्दल अपमानास्पद गोष्टी बोलत आहेत आणि मोदी शांतपणे ऐकतात. नरेंद्र मोदी कमजोर पंतप्रधान आहे आणि याचे नुकसान संपूर्ण देश भोगत आहे,” अशी पोस्ट काँग्रेसने केली आहे.
