Donald Trump India tour अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या निरनिराळ्या विषयांवर चर्चा होणार आहे. भारत आणि अमेरिकेदरम्यान अनेक करारांवरदेखील चर्चा करण्यात येणार आहे. तर ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यादेखील आज निरनिराळ्या ठिकाणांना भेट देणार आहेत.
सोमवारी अहमदाबादमधील मोटेरा स्टेडिअममध्ये आयोजित करण्यात आलेल्या नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाची माहिती दिली होती. तीन अब्ज डॉलर्सच्या अत्याधुनिक लष्करी हेलिकॉप्टर आणि अन्य उपकरणांसाठी मंगळवारी करार करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
कसा असेल त्यांचा आजचा कार्यक्रम ?
११ वाजता : सकाळी ११ वाजता ट्रम्प हे हैद्राबाद हाऊस येथे पोहोचणार आहेत. या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी विशेष भोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प हे एकत्र दुपारचं भोजन करणार आहेत.
१२.४० वाजता : सामंजस्य करारांनंतर दोन्ही नेते माध्यमांशी संवाद साधणार आहे. त्यानंतर ट्रम्प हे अमेरिकन दुतावासाला भेट देतील. तसंच उद्योजकांच्या भेटीचंही आयोजन करण्यात आलं आहे.
७.३० वाजता : सायंकाळी ७.३० वाजता ट्रम्प राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्यासाठी विशेष भोजनाचं आयोजन केलं आहे.
१० वाजता : रात्री १० वाजता ट्रम्प हे जर्मनी मार्गे अमेरिकेला रवाना होणार आहेत.
