ईशान्य दिल्लीतील जाफराबाद आणि मौजपूर परिसर दोन दिवसांपासून हिंसाचाराच्या आगीनं होरपळत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा सुरू असताना दुसरीकडं दिल्लीतील वातावरण तणावपूर्ण आहे. या सगळ्या हिंसाचारावर डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं.
अमेरिकेचे अध्यक्ष सोमवारपासून दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याला अहमदाबाद येथून सुरूवात झाल्यानंतर राजधानी दिल्लीत सीएए विरोधक आणि समर्थक यांच्यात वाद उफाळून आला. रविवार आणि सोमवार सलग दोन दिवस ईशान्य दिल्लीत दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या. यात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून, डोनाल्ड ट्रम्प यांनीही याविषयावर मत व्यक्त केलं आहे.
दोन दिवसांच्या दौऱ्या अखेरीस ट्रम्प यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी दोन्ही देशातील संबंध वृद्धिंगत करण्यावर जोर दिला. त्याचबरोबर दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचारावरही भाष्य केलं. ट्रम्प म्हणाले,”पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी चर्चा केली. आमच्यात धार्मिक स्वातंत्र्याबद्दल चर्चा झाली. भारतातील लोकांना धार्मिक स्वातंत्र्य मिळावं, अशी मोदी यांची इच्छा आहे. त्यांनी चर्चेवेळी हे मला सांगितलं. देशातील धार्मिक स्वातंत्र्यावर त्यांनी कठोर परिश्रम केले आहेत. या चर्चेत व्यक्तींवर (झुंडबळी) होणाऱ्या हल्ल्याबद्दल मी ऐकलं, पण मी त्याबद्दल चर्चा केली नाही. त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार भारताला आहे,” असं ट्रम्प यांनी सांगितलं.
US President on violence in North East Delhi and CAA: We did talk about religious freedom. The PM said he wants people to have religious freedom. They have worked really hard on it. I heard about the individual attacks but I did not discuss it. It is up to India. pic.twitter.com/p0hEYfqhU1
— ANI (@ANI) February 25, 2020
दिल्लीमधील हिंसाचारानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. आतापर्यंत नऊ जणांचे बळी गेले असून मृतांमध्ये पोलिसांचाही समावेश आहे. दुसरीकडं शंभरहून अधिक लोक जखमी झाले आहेत. हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी पोलीस आणि प्रशासनानं पुढील महिनाभरासाठी १४४ कलम लागू केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन बैठका घेतल्या आहेत. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपराज्यपाल आणि अमित शाह यांचीही बैठक झाली आहे. राजकीय नेत्यांनी शांतता पाळण्याचं आवाहन दिल्लीतील नागरिकांना केलं आहे.