President Donald Trump used strong language on Truth Social : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला त्यांच्या खास ‘ट्रम्प शैलीत’ धमकी देत इराणला थेट शिवीगाळ केली आहे. त्यांनी तेहरानमधील वीज प्रकल्प आणि पुलांवर समन्वित हल्ले करण्याचा उघड इशारा दिला आहे. या धमकीसोबतच ट्रम्प यांनी वापरलेल्या भाषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे; त्यांनी इराणचा अपमान करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) पुन्हा खुली करण्याची मागणी केली आहे.
२८ फेब्रुवारीपासून हा संघर्ष सुरू झालेला असताना अमेरिका आणि इस्रयाला प्रत्युत्तर म्हणून इराणने आखाती देशांना लक्ष्य केलं. एवढंच नव्हे तर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवरही निर्बंध आणले. परिणामी जगभरातील देशांची जलवाहतूक यामुळे ठप्प झाली आहे. त्यामुळे अमेरिकेवर युद्धसमाप्तीचा दबाव वाढला आहे. म्हणून अमेरिकेकडून सतत होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची मागणी केली जातेय. ४८ तासांचा अल्टिमेटम दिल्यानंतरही इराणने अमेरिकेकडे दुर्लक्ष केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा घसरली आहे. त्यांनी आता इराणला शिवीगाळ करत होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याची मागणी केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले?
“मंगळवारी पॉवर प्लांट डे आणि ब्रिज डे ठरेल. यापेक्षा दुसरं काहीही नसेल. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करा अथवा तुम्ही नरकात जाल. तुम्ही पाहतच बसा”, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

मंगळवारी इराणचे वीज प्रकल्प आणि पुलांवर मोठे हल्ले होऊ शकतात. या संघर्षातील हा एक निर्णायक क्षण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जगातील तेलाच्या पुरवठ्याचा मोठा हिस्सा ज्या ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’तून जातो, ते ठिकाण गेल्या काही आठवड्यांपासून संघर्षाचे केंद्र बनले आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरत इराणला इशारा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
दरम्यान, इराणने अमेरिकेचे दोन लढाऊ विमा पाडले होते. यामुळे दोन वैमानिक बेपत्ता झाले होते. परंतु, अमेरिकेने केलेल्या शोध मोहिमेमुळे या दोन्ही वैमानिकांना शोधण्यात यश आलं आहे. याबाबतही डोनाल्ड ट्रम्प यांनी सविस्तर पोस्ट लिहून घटनेची माहिती दिली होती.
