Iran 20 Hour Ultimatum: “अमेरिकेचा शांती प्रस्ताव मान्य करुन तडजोड न केल्यास अश्मयुगात पाठवू”, असा धमकी वजा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसापूर्वी दिल्यानंतर आता इराणने देखील अमेरिकेला त्याच भाषेत उत्तर दिले आहे. इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद-बाघेर गालिबाफ यांचे सल्लागार आणि राष्ट्रीय सुरक्षा विश्लेषक, मादी मोहम्मदी यांनी ट्रम्प यांच्या धमकीची खिल्ली उडवत त्यांनाच २० तासांच्या आत आत्मसमर्पण करण्याचा इशारा दिला आहे. मोहम्मदी यांनी एक्सवर याबाबत एक पोस्ट केली आहे.

मंगळवारची रात्र इराणसाठी काळरात्र?

अमेरिकेने ठेवलेला प्रस्ताव इराणने धुडकावून लावला आहे. यानंतर आक्रमक झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला २० तासांचा अल्टिमेटम देत मंगळवारी रात्रीपर्यंत निर्णय घेण्याची मुभा दिली आहे. सोमवारी रात्री ट्रम्प यांनी एका रात्रीत इराण उदध्वस्त करण्याची धमकी देत ती रात्र कदाचित मंगळवारची असू शकते, असेही त्यांनी म्हटले आहे. उभय देशातील संघर्ष तीव्र झाला असताना राष्ट्रीय सुरक्षा विश्लेषकाने केलेल्या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले आहे.

मादी मोहम्मदी यांनी एक्सवर काय पोस्ट केली आहे?

“खरी परिस्थिती अशी आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आत्मसमर्पण करण्यासाठी २० तासांचा वेळ आहे. अन्यथा इराण अमेरिकेसह त्यांच्या साथीदारांनी अश्मयुगात पाठवेल, आम्ही माघार घेणार नाही”, असे एक्स पोस्टमध्ये मादी मोहम्मदी यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्या धमकीला इराणने त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी

डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी इराणला अश्मयुगात पाठविण्याची धमकी दिली होती. अमेरिकेने मांडलेला शांती प्रस्ताव इराणने धुडकावून लावला होता. यानंतर ट्रम्प यांनी इराणच्या अधिकारी आणि सर्वोच्च नेतृत्वाला विचारपूर्वक निर्णय घेण्याचा सल्ला दिला होता. ट्रम्प यांनी बिनशर्त होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची अट इराणसमोर ठेवली आहे. ट्रम्प यांनी मंगळवारी इराणमधील उर्जा केंद्र आणि पूलांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे.

संघर्ष तीव्र होण्याची शक्यता

अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता चर्चेसाठी पाकिस्तान, तुर्किये आणि इजिप्त मध्यस्थी करत आहे. अमेरिका मध्यस्थी देशांच्या माध्यमातून इराणसमोर प्रस्ताव मांडत आहेत. मात्र, इराणकडून त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. दरम्यान, दोन्ही देशांमध्ये ४५ दिवसांच्या शस्त्रसंधीचाही प्रस्ताव विचाराधीन आहे. दरम्यान, ट्रम्प आणि इराणने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे या संघर्षावर तोडगा निघण्याची शक्यता धूसर होत चालली आहे.