Donald Trump Iran Airstrikes update confirms a temporary ceasefire on energy sites to facilitate backchannel diplomacy : अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या काही आठवड्यापासून संघर्ष सुरू आहे. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण इराणने केलेल्या विनंतीनंतर त्यांच्या ऊर्जेशी संबंधित पायाभूत सुविधांवरील हल्ले १० दिवसांसाठी स्थगित करत असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान यामुळे या दोन देशांमध्ये संघर्ष सुरूच असला तरी राजनैतिक चर्चेसाठी मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

“इराणी सरकारच्या विनंतीनुसार, मी ऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त करण्याचा कालावधी १० दिवसांसाठी म्हणजेच सोमवार, ६ एप्रिल २०२६ रात्री ८ वाजेपर्यंत, ईस्टर्न टाईम स्थगित करत आहे,” असे ट्रम्प ट्रूथ सोशलवर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी इराणबरोबर वाटाघाटी सुरू आहेत आणि त्यामध्ये चांगल्या प्रगतीचे चिन्ह दिसून येत असल्याचेही सूचित केले आहे. “चर्चा सुरू आहे आणि ती अत्यंत चांगल्या प्रकारे चालली आहे,” असे ट्रम्प म्हणाले आहेत.

ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवरील हल्ले काही दिवसांसाठी स्थगित केल्याने ‘बॅकचॅनल डिप्लोमसी’साठी संधी मिळू शकते. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणच्या लष्करी आणि आर्थिक क्षमता कमजोर करण्यासाठी त्यांच्या पायाभूत सुविधांवर गेल्या काही आठवड्यांपासून जोरदार हल्ले सुरू आहेत, यामध्ये महत्त्वाच्या तेल आणि ऊर्जा केंद्रांचा देखील समावेश आहे. यादरम्यान ट्रम्प यांनी हल्ले काही दिवसांसाठी थांबवत असल्याची घोषणा केली आहे.

अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांनी इराणने देखील प्रत्युत्तर दिले आहे. इराणकडून प्रदेशात ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले जात आहेत. ज्यामध्ये अमेरिकेचे लष्करी तळ आणि इतर पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले, ज्यामुळे या संघर्षाची व्याप्ती वाढल्याचे दिसून आले.

मात्र ट्रम्प यांनी जाहीर केलेला हा १० दिवसांच्या विरामामुळे तात्पुरती शांतता राहाणार की यामुळे व्यापक प्रमाणात युद्धबंदीचा निर्णय होईल हे मात्र स्पष्ट झालेले नाही. ट्रम्प यांच्या निवेदनात हल्ले आणखी काही दिवस थांबवण्यासाठी कोणत्याही विशिष्ट अटी घालण्यात आल्या याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. मात्र इराणने विनंती केल्याचा उल्लेख असल्याने काही प्रमाणात दोन्ही देशांमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संवाद झाला असल्याची शक्यता दिसून येते.

डोनाल्ड ट्रम्प यांनी २२ मार्च रोजी इराणला इशारा दिला होता की जर होर्मुझची सामुद्रधुनी ४८ तासांत खुली केली गेली नाही तर अमेरिका त्यांच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ला करेल. मात्र एका दिवसानंतर ट्रम्प यांनी इराणबरोबर संघर्ष संपवण्यासाठी चांगली चर्चा झाल्याचे कारण सांगत हे नियोजित हल्ले ५ दिवसांसाठी स्थगित केले होते.