Donald Trump Iran attack hold : अमेरिका आणि इराण यांच्या युद्धविराम झाला असला तरीही अमेरिकेकडून आज इराणवर लष्करी हल्ले करण्यात येणार होते. मात्र, इराणबरबोर वाटाघाटी सुरू असल्याने आखाती देशातील नेत्यांच्या विनंतीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे लष्करी हल्ले थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रूथ या सोशल मिडिया खात्यावरून पोस्ट केली आहे.
अमेरिकेने आजचा हल्ला थांबवला
इराणवरील अमेरिकेचा लष्करी हल्ला मंगळवारी नियोजित होता. परंतु कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीसह आखाती देशांच्या नेत्यांनी त्यांना हा हल्ला पुढे ढकलण्याची विनंती केली होती. याबाबत ते म्हणाले, कतारचे अमीर, तमीम बिन हमद अल थानी, सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान अल सौद आणि संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी मला इराणच्या इस्लामिक प्रजासत्ताकावर उद्या नियोजित असलेला लष्करी हल्ला थांबवण्यास सांगितलं आहे. कारण, सध्या गंभीर वाटाघाटी सुरू आहेत आणि महान नेते व मित्रराष्ट्र म्हणून त्यांच्या मते एक असा करार होईल जो अमेरिका आणि मध्य पूर्व आणि त्यापलीकडल सर्व देशांना अत्यंत स्वीकारार्ह असेल. या करारामध्ये, महत्त्वाचं म्हणजे इराणला कोणतीही अण्वस्त्रे मिळणार नाहीत.
ट्रम्प यांनी असंही सांगितलं की, त्यांनी संरक्षण सचिव पीट हेगसेथ, जॉइंट चिफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष डॅनियल केन आणि अमेरिकी लष्कराला सध्या नियोजित हल्ला न करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, वाटाघाटी अयशस्वी झाल्यास तत्काळ लष्करी कारवाईसाठी तयार राहण्यास सांगितलं आहे.
…तर मोठा हल्ला करणार
“वर उल्लेखलेल्या नेत्यांबद्दल असलेल्या माझ्या आदरापोटी मी युद्धमंत्री पीट हेगसेथ, जॉइंट चिफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष डॅनियल केन आणि अमेरिकी लष्कराला सूचना दिली आहे की आम्ही उद्या इराणवर नियोजित हल्ला करणार नाही. परंतु जर एखादा स्वीकारार्ह करार झाला नाही तर क्षणाचाही विलंब न लावता इराणवर पूर्ण आणि मोठ्या प्रमाणावर हल्ला करण्यास तयार राहावं”, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

दरम्यान, २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या युद्धाला एप्रिल महिन्यात विराम मिळाला. तेव्हापासून अमेरिका आणि इराण यांच्यात वाटाघाटी सुरू आहेत. एकमेकांना प्रस्ताव पाठवले जात असून दोन्ही देश आपआपल्या मतांवर ठाम आहेत. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करून अणूकरार करण्याच्या सूचना अमेरिकेकडून करण्यात येत असताना इराणने मात्र अणूकराराला नकार दिला आहे. अमेरिकेने नुकत्याच अमेरिकेला पाठवलेल्या पाच प्रस्तावांपैकी ४०० किलोग्रॅम युरेनियम अमेरिकेला सोपवावं अशीही मागणी केली आहे. त्यामुळे या वाटाघाटी कधीपर्यंत चालणार आणि यांच्यात अंतिम करार कधी होणार याकडे अवघ्या जगाचं लक्ष आहे. कारण, या युद्धामुळे जगभरातील देशांमध्ये इंधन दरवाढ झाली असून थेट सामान्यांच्या खिशावर ताण येत आहे.
