अमेरिका आणि इराणमधील युद्ध तीन महिन्यांच्या कालावधीनंतर थांबलं होतं. दोन्ही देशांत युद्धविरामाची घोषणा देखील झाली होती. त्यामुळे दोन्ही देशातील तणाव हळूहळू कमी होत असतानाच अचानक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबरोबरचा युद्धबंदीचा हंगामी करार संपुष्टात आल्याची घोषणा केली आहे.
तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा थेट युद्धाची धमकी दिल्यामुळे जगात खळबळ उडाली आहे. ‘आज रात्री इराणवर पुन्हा हल्ला होऊ शकतो’ अशी नवी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिली आहे. ट्रम्प यांच्या या धमकीमुळे मध्य पूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचे ढग गडद झाले आहेत. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं?
अमेरिका आणि इराणमधील युद्धबंदी करार संपल्याची घोषणा केल्यानंतर काही तासांतच डोनाल्ड ट्रम्प यांनी आज रात्री अमेरिका इराणवर हल्ला करणार असल्याचे संकेत दिले आहेत. ट्रम्प यांनी म्हटलं की, “हॉर्मुज सामुद्रधुनीमध्ये इराणने जहाजांवर केलेले हल्ले, म्हणजे युद्धविरामाच्या कराराचं उल्लंघन आहे. इराण सध्या जे काही करत आहे, त्याबद्दल मी समाधानी नाही. हा विषय सत्तापालटाचा नाही. मात्र, इराणला अणुशस्त्र मिळावे, अशी आमची अजिबात इच्छा नाही. त्यामुळे इराण करत असलेले हे हल्ले युद्धविरामाच्या कराराचं उल्लंघनच आहे. इराणने असं करणं चुकीचं आहे. इराणबरोबरच्या आमच्या करारानुसार, त्यांनी त्यांचा अणुकार्यक्रम थांबवणं आवश्यक आहे, अन्यथा आम्ही स्वतः तो थांबवू”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
ट्रम्प यांनी इराणला काय धमकी दिली?
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर पुन्हा एकदा हल्ला करण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी म्हटलं की, “हे युद्ध नाही, तर इराणला अणुशस्त्रांपासून मुक्त करण्याची ही एक मोहीम आहे. कदाचित आज रात्रीच इराणवर पुन्हा एकदा हल्ला होऊ शकतो. मी त्यांना हा केवळ एक इशारा देत आहे”, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.
युद्धबंदी करार संपल्याची घोषणा, पण चर्चा सुरू ठेवण्यास संमती
दरम्यान, पश्चिम आशियातील तणाव आता टोकाला पोहोचला असून अमेरिका आणि इराण पुन्हा एकदा समोरा-समोर येण्याची चिन्ह निर्माण झाले आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये तेलवाहू जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने इराणवर लष्करी हल्ले सुरू केले आहेत. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली की, इराणबरोबरचा तात्पुरता ‘युद्धबंदी करार’ आता अधिकृतपणे संपला आहे. पण युद्धबंदी करारच्या चर्चा सुरू ठेवण्यास त्यांनी संमती दिली आहे.
