Trump Iran Assassination Threat triggers : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. “जर इराणने माझी हत्या करण्यात यश मिळवले, तर त्या देशावर यापूर्वी कधीही न झालेल्या पातळीवर बॉम्बहल्ले करण्याच्या सूचना मी आधीच दिल्या आहेत”, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
इराणच्या लक्ष्यावर मी अनेक वर्षांपासून आहे
‘न्यूयॉर्क पोस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, “मी अनेक वर्षांपासून इराणच्या लक्ष्यावर आहे. ज्याचा आम्ही सामना करत आहोत.” अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना लक्ष्य करण्याच्या इराणी कटाबाबत इस्रायलने माहिती दिली होती, मात्र, सध्या त्यांच्या हत्येचा कोणताही ताजा कट उघड झालेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इस्रायलने ट्रम्प यांच्या हत्येच्या कथित इराणी कटाबाबत माहिती दिल्याच्या वृत्तांवर त्यांनी सांगितले, “नाही, इस्रायलकडून अशी कोणतीही नवीन माहिती मिळालेली नाही. मी इराणच्या यादीत पहिल्या क्रमांकावर बराच काळ आहे,” असे सांगितले.
ट्रम्प म्हणाले, “मी स्पष्ट सूचना देऊन ठेवल्या आहेत. माझ्याबाबत काही घडले, तर इराणवर अशा स्तरावर बॉम्बहल्ले करा, जे त्यांनी यापूर्वी कधीही पाहिले नसतील.”
इराणला अण्वस्त्रे मिळू देणार नाही
यापूर्वीही ट्रम्प यांनी आपण इराणचे ‘नंबर वन टार्गेट’ असल्याचे सांगितले. तसेच, इराणला अण्वस्त्रे मिळू दिली जाणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी मांडली. भविष्यात तेहरानसोबतचा संघर्ष वाढला तरी तो जास्त काळ चालणार नाही, असेही त्यांनी म्हटले.
लष्करी कमांडर कासिम सोलेमानी हल्ल्यानंतर वाढला तणाव
२०२० मध्ये ट्रम्प यांच्या आदेशानुसार झालेल्या अमेरिकन ड्रोन हल्ल्यात इराणचे वरिष्ठ लष्करी कमांडर कासिम सोलेमानी यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इराणकडून ट्रम्प यांच्याविरोधात सूड उगवण्याची भूमिका अनेकदा व्यक्त करण्यात आल्याचे न्यूयॉर्क पोस्टने म्हटले आहे.
अमेरिकन अधिकाऱ्यांनीही गेल्या काही वर्षांत ट्रम्प यांच्याविरोधातील कथित इराणी कटांबाबत माहिती दिली होती. तसेच जुलै २०२४ मध्ये बटलर येथील प्रचारादरम्यान ट्रम्प यांच्यावर हत्येचा प्रयत्न झाला होता, ज्यामध्ये एक गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली होती.
इराणने चर्चेची मागणी अमेरिकेने केली मान्य – ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, इराणने अमेरिकेसोबत चर्चा सुरू ठेवण्याची विनंती केली होती; मात्र त्यांनी हे स्पष्ट केले की दोन्ही देशांमधील युद्धबंदी संपुष्टात आली आहे.
