Donald Trump Iran News update regarding the rejected ceasefire proposal and Strait of Hormuz conflict : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाबाबत केलेल्या विधान बुधवारी इराणने फेटाळून लावले आहे. “इराणने शस्त्रसंधी करण्याची मागणी केली आहे”, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. मात्र इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ट्रम्प यांचा हा दावा ‘खोटा आणि निराधार’ असल्याचे म्हटले आहे. इराणच्या सरकारी टीव्हीच्या हवाल्याने रॉयटर्सने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ट्रूथ सोशलवर पोस्ट करत म्हणाले होते की, इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेकडे युद्धविरामाची मागणी केली आहे. तसेच ट्रम्प यांनी पुढे असाही दावा केली की, त्यांनी यावर असे उत्तर दिले आहे की, जर होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली गेली तरच ते युद्धविरामाचा विचार करतील. तोपर्यंत इराणवरील भीषण हल्ले सुरूच ठेवले जातील.

इराण युद्ध सुरू ठेवण्याची तयारी

दरम्यान इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी मंगळवारी उशिरा अल जझीरा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इराणची युद्ध सुरू ठेवण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, “तुम्ही इराणच्या लोकांशी धमक्या आणि डेडलाईनच्या भाषेत बोलू शकत नाहीत, स्वत:चे संरक्षण करण्यासाठी आम्ही कोणतीही डेडलाईन निश्चित केलेली नाही.”

अमेरिका लवकरच इराणमधून बाहेर पडणार

तर दुसरीकडे ट्रम्प यांनी, अमेरिका इराणविरोधातील युद्ध लवकरच संपवून शकते आणि गरज वाटल्यास ‘स्पॉट हिट्स’साठी परत येऊ शकते, असेही सूचत केले. जेव्हा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना विचारण्यात आले अमेरिका हे युद्ध संपल्याचे कधी मानेल, तेव्हा ट्रम्प म्हणाले की, “मी तुम्हाला नेमकी वेळ सांगू शकत नाही… पण आम्ही लवकरच बाहेर पडू.” तसेच ट्रम्प यांनी आता इराणकडे अण्वस्त्र असणार नाहीत, करण इराण ते बाळगण्यास आता असमर्थ आहे, असा दावाही ट्रम्प यांनी यावेळी केला.