Donald Trump offers Iran reconstruction aid to ensure long-term regional peace and stability : अमेरिका-इराण संघर्षात आता युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. इराणने अमेरिकेला १० कलमी प्रस्ताव ठेवून दोन आठवड्यांचा युद्धविराम जाहीर करण्यात आला आहे. या युद्धात इराणसहित मध्य पूर्वेतील देशांमध्ये भीषण नरसंहार झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्य पूर्व आशियातील शांततेबाबत एक अत्यंत सकारात्मक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. जागतिक शांततेसाठी हा एक मोठा दिवस असल्याचे सांगत त्यांनी इराणसोबतच्या संबंधांमध्ये नव्या पर्वाची नांदी मिळण्याचे संकेत दिले आहेत.
ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “जागतिक शांततेसाठी हा मोठा दिवस आहे! इराणला आता शांतता हवी आहे, ते संघर्षाला कंटाळले आहेत आणि जगाचीही तीच भावना आहे.” विशेषतः व्यापार आणि दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ‘हॉर्मुझ सामुद्रधुनी’मधील (Strait of Hormuz) वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी अमेरिका मदत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पुनर्बांधणी आणि आर्थिक प्रगतीवर भर
इराण आता आपल्या देशाच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरू करू शकतो, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होईल आणि सर्वांनाच याचा फायदा होईल, असेही त्यांनी नमूद केले. अमेरिका इराणला सर्व प्रकारच्या साधनसामग्रीचा पुरवठा करण्यासाठी सज्ज असून, सर्व काही सुरळीत पार पडेल याची खात्री करण्यासाठी अमेरिका तिथे तत्पर असेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

मध्य पूर्व आशियाचा ‘सुवर्णकाळ’
ज्याप्रमाणे अमेरिकेत प्रगतीचे वारे वाहत आहेत, त्याचप्रमाणे आता मध्य पूर्व आशियातही ‘सुवर्णकाळ’ (Golden Age) येईल, असा ठाम विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या विधानामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव कमी होऊन सकारात्मक सहकार्याचे युग सुरू होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
इराणने अमेरिकेवर काय अटी घातल्या?
- अहिंसेप्रती कटिबद्धता
- होर्मुज सामुद्रधुनीवर इराणचं नियंत्रण कायम राहणार
- युरेनियम संवर्धनास परवानगी
- सर्व प्राथमिक निर्बंधांची समाप्ती
- सर्व दुय्यम निर्बंधांची समाप्ती
- संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सर्व ठरावांचा अवलंब थांबवणे
- गव्हर्नर्स बोर्डच्या सर्व ठरावांचा अवलंब थांबवणे
- इराणला नुकसानभरपाई देणं
- पश्चिम आशियातील अमेरिकेच्या सैन्याची माघार
- लेबनॉनमधील हिझबुल्लाहविरुद्ध युद्धासह सर्व संघर्षांवर युद्धविराम
या १० कलमी प्रस्तावानंतर इराण आणि अमेरिकेत यांच्यात युद्धविरामाचा करार झाला.
