एपी, दुबई
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील ऊर्जा प्रकल्पांवरील संभाव्य हल्ले पाच दिवस लांबणीवर टाकण्याची घोषणा सोमवारी केली. होर्मुझ सामुद्रधुनी खुली केली नाही, तर इराणच्या ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. इराणने मात्र ट्रम्प यांच्या घोषणेला अमेरिकेची माघार म्हणून संबोधले आहे.

‘अमेरिका आणि इराणमध्ये अतिशय चांगली आणि सकारात्मक चर्चा झाली. युद्धावर पूर्ण तोडगा यातून निघेल. ही चर्चा आठवडाभर चालेल,’ असा दावा ट्रम्प यांनी समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये केला. पण इराणमध्ये कोणाशी चर्चा केली गेली, याचे तपशील त्यांनी दिले नाहीत. इराणने अमेरिकेशी चर्चा झाल्याचे वृत्त फेटाळले. मात्र, त्यापूर्वी इराणचे अब्बास अराघची यांनी तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हकन फिदान यांच्याशी चर्चा केली. अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चेसाठी तुर्की मध्यस्थी करत आहे. युद्धाचा हा चौथा आठवडा असून, संघर्षात दोन हजारांवर जणांचा बळी गेली आहे.

‘इराणच्या इशाऱ्यामुळेच माघार’

दुबईः अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीवरून इराणला ४८ तासांची मुदत दिल्यानंतर इराणनेही अमेरिकेला होर्मुझची सामुद्रधुनी पूर्ण बंद करू, असा इशारा दिला होता. तसेच, पश्चिम आशियातील वीज प्रकल्प आणि पर्शियन आखातातील खाणींना लक्ष्य करण्याचा इराणने इशारा दिला होता. इराणच्या या इशाऱ्यामुळे अमेरिकेने माघार घेतली, असे वृत्त इराणच्या सरकारी माध्यमांनी दिले. अमेरिकेने दिलेली मुदत मंगळवारी रात्री बारा वाजता संपणार होती. पण, सोमवारीच ट्रम्प यांनी मुदतीत पाच दिवसांची एकतर्फी वाढ केली.